..........
गीता चंद्रकांत सवार
............
कात्रज परिसरातील उत्कर्ष सोसायटीमधील लेन नंबर एक मध्ये आमचा बंगला आहे. मुलत: निसर्गरम्य असलेल्या या परिसरात आम्ही ठरवून वास्तु घेतली आणि महिनाभरापुर्वीच गृहप्रवेश केला.
माझ्या घराचे वैशिष्ट्य म्हणजे मला, माझ्या कुटुंबाला सोयीस्कर असेल अशा पध्दतीने रचना तर केलीच शिवाय ते करताना मी जास्तीत जास्त सूचना केल्या आणि त्यांचा समावेश करून स्वप्नातले घर साकारले. अगदी मनासारखे.
आमच्या बंगल्याच्या भूखंडांचे क्षेत्रफळ सुमारे चार हजार चौरस फुट आहे. त्यावर दुमजली असे तब्बल तीन हजार चौरस फुट बांधकाम केले आहे. याशिवाय टेरेसचा सुयोग्य उपयोग करून त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ डोम बांधल्यामुळे घराला परिपुर्णता आली आहे..
तळमजल्यावरच, वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने मुख्य प्रवेशद्वाराजवळ छोटेसे पण आकर्षक उद्यान, त्यात धबधबा, पडवीत भासावी अशा ठिकाणी झोपाळा आहे. त्यामुळे घराचे प्रवेशद्वार परिसरामुळे भव्यता प्राप्त झाली आहे.
तळमजल्यावर बैठक हॉल, स्वयंपाकघर, आकर्षक आणि कमी जागेत जास्तीत जास्त सामान बसेल अशा किचन ट्रालीज, भांडार कक्ष आणि दोन बेडरूम तर पहिल्या मजल्यावर हॉल, मास्टर बेडरूम आणि मुलासाठी बेडरूम अशी रचना आहे. पारंपारीक जपणूकीबरोबरच अधुनिकतेचा बाज या घराला देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.