कोरोनाची तिसरी लाट खरच येणार का... माझे पती कोरोनाने गेले, काही मदत मिळेल का
डमी - स्टार ९११
पुणे : कोरोनाची तिसरी लाट खरच येणार का हो... माझे पती कोरोनाने गेलेत कुटुंबाची जबाबदारी आता माझ्यावर आलीय.. काही मदत मिळेल का.... तिस-या लाटेत खरच लहान मुलांना संसर्ग अधिक होणार का... तिस-या लाटेत पुन्हा लाॅकडाऊन करणार का... सध्या कोरोनाची चिंता कमी झाली असली तरी संभाव्य तिस-या लाटेबाबत नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड शंका असल्याचे कोरोना कंट्रोल रूम मध्ये येणा-या फोन वरून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषदेसह प्रत्येक तालुकाच्या ठाकाणी कोरोना रुग्ण, रुग्णांचे नातेवाईकांना मदत करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत नागरिकांना अनेक प्रश्न, अनेक अडचणी असल्याने हेल्पलाईनचे फोन सतत खणखणत होते. यामुळेच पहिल्या लाटेत तब्बल अडीच हजार पेक्षा अधिक लोकांनी हेल्पलाईनवर फोन करून आपल्या समस्या, अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. तर दुस-या लाटेत आता पर्यंत 1686 लोकांनी हेल्पलाईनवर फोन केले आहे. परंतु आता रुग्ण संख्या कमी झाल्याने फोनची संख्या देखील कमी झाली असून, कोरोनाच्या तिसरी लाटेबाबत काही नागरिक प्रश्न विचारत आहेत.
-------
कंट्रोल रूमकडे आता पर्यंत आलेल्या तक्रारी
औषधे मिळत नाही : 284
हाॅस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होईल का : 186
म्युकरमायकोसिस उपचार कुठे होतात : 89
कोरोनाची तिसरी लाट व पुन्हा लाॅकडाऊन : 50
------
रुग्ण संख्या कमी झाल्याने फोन ही कमी झाले
कोरोना काळात रुग्ण व नातेवाईक यांच्या मदतीसाठी जिल्हा कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत दररोज शेकडो नागरिक विविध समस्या व अडचणीसाठी फोन करत होते परंतु आता जिल्ह्यात रुग्ण संख्या चांगलीच कमी झाली असून, तक्रारीची संख्या खूप कमी झाली आहे.
- विठ्ठल बनोटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
-------