पुणे : पुण्यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी त्यांच्या लग्नाविषयी बोलताना सावध भूमिका घेत माझे लग्न माझ्या कामाशी झाले आहे, असे सांगितले.
पुण्यातील हडपसर येथील महालक्ष्मी लॉन्सवर राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यादरम्यान राहुल गांधी यांना अभिनेता सुबोध भावे यांनी काही गंमतीशीर प्रश्न विचारले. सर, तुमच्यावर बायोपिक करायचा आहे, असा पहिला प्रश्न सुबोध भावे यांनी राहुल गांधी यांना विचारला. यावर दिग्दर्शक कोण असेल? असे राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर सुबोध भावे यांनी मी दिग्दर्शन करतो, पण हिरोईन म्हणून कोणाला घेऊ? असा दुसरा प्रश्न केला. यावेळी राहुल गांधी यांनी आपली सावध भूमिका घेत सांगितले की, माझे लग्न माझ्या कामाशी झाले आहे. राहुल गांधी यांच्या या उत्तरानंतर सुबोध भावे म्हणाले, 'मग हिरोईन घेतो आणि तिचे नाव काम (वर्क) असे ठेवतो.'
दरम्यान, पुण्यातील महालक्ष्मी लॉन्सवर आयोजित संवाद कार्यक्रम हा राजकीय स्वरूपाचा नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. यावेळी महालक्ष्मी लॉन्सच्या हॉलबाहेर विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच कार्यक्रमातील उपस्थितांसाठी संगीत-नृत्य कार्यक्रमही झाले. या संवाद कार्यक्रमाला प्रेक्षकांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, विश्वजीत कदम यांच्यासह शहरातील काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी हजेरी लागली होती. तत्पूर्वी, पुण्यातील आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, अमोल कोल्हे, मोहन जोशी यांनी कोरेगाव पार्कमधील हॉटेल वेस्ट इन येथे राहुल गांधी यांची भेट घेतली.
(आपण एकमेकांचा बायोपिक करू; राहुल गांधी-सुबोध भावेचं ठरलं)