महर्षी वाल्मीकींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हेनगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत हद्दीतील असणारा पहिला मुक्काम वाल्हे येथे असतो. यंदा आषाढी वारी दोन जुलै रोजी सुरू होत आहे.
गेल्या वर्षी कोरोना महामारामारीच्या संकटामुळे वारी प्रातिनिधिक स्वरूपात झाली होती. त्यामुळे वारकऱ्यांना पायी वारी करता आली नाही. त्यामुळे वारीची परंपरा खंडित झाली असल्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये मोठी नाराजी आहे. यंदा तरी हा सोहळा व्हावा व शासनाने त्यासाठी दक्षतेचे सर्व उपाय घेऊन परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी हभप बबन महाराज भुजबळ यांनी व्यक्त केली.
कोरोनाचे हे संकट अजून कमी झालेले नाही, परंतु वारीसाठी तब्बल महिनाभर अवकाश आहे. त्यामुळे योग्य ते नियोजन करून शासनाने पायी वारी कशी करता येईल याचा सकारात्मक विचार केला केला पाहिजे. वारकऱ्यांची संख्या आणि ज्या गावातून सोहळा जाणार आहे तेथली परिस्थिती पाहून गावापासून दोन तीन किलो मीटरवर मुक्काम करून हा सोहळा मर्यादित स्वरूपात का होईना पण पायी वारी व्हायला हवी. महामारीचा नेमका किती त्रास होईल याचाही शोध घ्यायला हवा, असे मत महर्षी वाल्मीकी पालखी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. अशोकमहाराज पवार यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्कामाचे वाल्हे हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. आद्य रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषींचे संजीवनी समाधी मंदिर वाल्हे गावात असल्याने, आषाढी वारीसाठी दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून वारकरी संप्रदायातील अनेक लहान-थोर वाल्हे येथील वाल्मीकी मंदिरात येऊन नतमस्तक होत असतात. वाल्हे गावातून मागील काही वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराज पालखीची पूर्वपरंपरा असलेली ग्राम प्रदर्शन खंडित झाली असल्याने, ग्रामस्थांच्यामधून नाराजी आहेच. त्यातच मागील वर्षांपासून कोरोना संकटामुळे पायी पालखी सोहळा शासनाने रद्द केले होते. समाजहितासाठी शासन योग्य तो निर्णय घेईल. तो आम्हास मान्य असेल; परंतु शासनाने कमी वारकऱ्यांच्या उपस्थित का होईना, पण पायी पालखी सोहळा पंढरपूरकडे घेऊन जावा. पायी पालखी सोहळ्याची पूर्वापर परंपरा खंडित होऊ नये हीच पांडुरंगचरणी प्रार्थना आहे.
- महावीर भुजबळ,
पायी पालखी सोहळ्यातील वारकरी भक्त.