पुणे : विधानसभेच्या रणधुमाळीत पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर आताच चर्चेत आलेल्या वडगाव शेरीबाबत सस्पेन्स कायम राहिला आहे. हडपसर विधानसभा मतदार संघातून महायुतीतून अजित पवार गटाला उमेदवारी मिळाल्यानंतर भानगिरेंचा पत्ता कट झाला. मात्र वडगाव शेरीमधून महायुतीत जागावाटप आणि उमेदवारीबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. वडगाव शेरीतून अजित पवार गटाकडून सुनील टिंगरे तर भाजपकडून जगदीश मुळीक इच्छुक आहेत. पण अजूनही त्या भागात उमेदवार देण्यात आलेला नाही. अशातच वडगाव शेरीतून आज नाहीतर उद्या माझ्या नावाची घोषणा होईल असा विश्वास टिंगरे यांनी व्यक्त केला आहे.
टिंगरे म्हणाले, अजित दादांवरती माझा पूर्ण विश्वास आहे. मला पक्षाने ए बी फॉर्म दिलेला आहे. वडगाव शेरीत विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक लढवणार आहे. मैत्रीपूर्ण लढतीचा प्रश्नच येत नाही. असं ठरलं तर मैत्रीपूर्ण लढत अनेक मतदारसंघात लढावं लागेल. शरद पवारांची सहानुभूती घेऊन जर कोण लढत असेल तर ते कधीच यशस्वी होणार नाहीत. माझ्यासमोरील उमेदवार आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी. शरद पवार कालही आमच्यासाठी दैवत होते ते माझे कान पकडू शकतात माझ्या चार पिढ्याने त्यासाठी काम केलं आहे.
आज नाही तर उद्या घोषणा होईल
माझं अजित दादा पवार यांच्याशी बोलणं झालं आहे. प्रफुल पटेल यांच्याशी बोलणे झालेलं आहे. सर्वांनी मला विधानसभा लढण्यासाठी सांगितलय. त्यामुळे वडगाव शेरीतून आज नाहीतर उद्या माझ्या नावाची घोषणा होईल.
‘लडेंगेभी जितेंगेभी’
वडगाव शेरी मतदारसंघातही भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागेल असे दिसू लागले आहे. माजी आमदार जगदीश मुळीक यांना पक्षाने लोकसभेचा शब्द दिला होता, मात्र उमेदवारी मिळाली नाही. त्याआधीच भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केली. ही जागा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे मुळीक यांची परत अडचण झाली आहे. त्यांनी पक्षाकडे ही जागा अजित पवार यांच्याकडून मागून घ्यावी अशी मागणी केली. ती पूर्ण झाली नाही तर ‘लडेंगेभी जितेंगेभी’ असे त्यांनी समाजमाध्यमांवर जाहीर केले आहे.