Sharad Pawar: आई-वडीलांनी, भावांनी मला कधी घर फोडायचे पाप शिकवले नाही; शरद पवारांचा अजित दादांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 06:57 PM2024-10-29T18:57:53+5:302024-10-29T18:58:36+5:30

पक्ष मी काढला, चिन्ह माझे होते, काही लोकांनी वेगळा विचार केला आणि मला कोर्टात उभे राहण्याची वेळ आणली

My parents and brothers never taught me the sin of breaking the house; Sharad Pawar attacked Ajit Dada | Sharad Pawar: आई-वडीलांनी, भावांनी मला कधी घर फोडायचे पाप शिकवले नाही; शरद पवारांचा अजित दादांवर घणाघात

Sharad Pawar: आई-वडीलांनी, भावांनी मला कधी घर फोडायचे पाप शिकवले नाही; शरद पवारांचा अजित दादांवर घणाघात

काटेवाडी (बारामती) : मी घर फोडल्याची भाषा काल बारामतीत झाली. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. घर मोडणे हा माझा स्वभाव नाही. पवार कुटुंबातील मी वडीलधारी आहे. नेहमीच मी कुटुंब एकत्र कसे राहिल हे पाहिले. माझ्या आई-वडीलांनी, भावांनी मला कधी घर फोडायचे पाप शिकवले नाही. माझे भाऊ माझ्या पाठीशी होते. म्हणून मी समाजकारणात आलो. आजही मी घरात वडीलधारा आहे. त्यामुळे मी सगळ्यांचे हित पाहतो, अशा  शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघात केला.

कन्हेरी येथे ‘मविआ’चे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कुटुंबातील वडीलधारी म्हणून माझ्या कुटुंबात माझे सगळे ऐकतात. मी राजकारण करत असताना अन्य भावांना शेती, उद्योगंधद्यांसाठी मदत केली. त्यांच्या आशीर्वादानेच मी राजकारण करू शकलो. मी राज्य चालवायची जबाबदारी सोडत सगळा कारभार त्यांच्या हाती दिला. मी राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष होतो. मात्र नव्या पिढीकडे सगळे अधिकार दिले. गेली २० वर्षे मी बारामतीत लक्ष घातले नाही. साखर कारखाने, दूध संघ, बँक, खरेदी-विक्री संघ आदी संस्थांमध्ये कोणाला संधी द्यायची याचे सर्वाधिकार त्यांना दिले. चार वेळी उपमुख्यमंत्री पदाची संधी दिली. तरी त्यांनी पहाटे सहालाच तिकडे जात शपथ घेतली.अनेकांना झोपेतून उठवून तिकडे नेले. परिणाम काय झाला, अवघ्या चार दिवसात पद गेले. नंतरच्या काळात तर पक्षच घेवून दुसरीकडे जावून बसले. त्यातून त्यांना पद मिळाले, पण या आधी सुद्धा मिळाले होतेच ना, असे शरद पवार म्हणाले.

मी राज्यात अनेकांना मंत्री केले, उपमुख्यमंत्री केले. एकदाही सुप्रियाला पद दिले नाही. बाकीच्यांना पदे दिली. बारामतीचा विकास सांगितला जातो. विकास हा सगळ्यांच्या प्रयत्नातून होत असतो. त्याचा मला आनंद आहे. चांगल्याला चांगले म्हणणे हा माझा स्वभाव आहे. बारामतीत १९७२ ला मी विद्या प्रतिष्ठान, कृषी विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून शिक्षण व शेती क्षेत्रात मोठे काम झाले. आप्पासाहेब पवार यांनी संस्थांचे काम सांभाळले. बारामतीसह जेजुरी, इंदापूरला एमआयडीसी आणली. बारामतीत शेती व दूध उत्पादनांशी संबंधित कंपन्या आल्या. डायनामिक्स डेअरीचे चाॅकलेट जगभर मेड इन बारामती म्हणून पोहोचले. आमचा गडी फाॅरेनचा माल इथे आणतोय. आम्ही दारुचा कारखाना काढला नाही, काही लोकांनी असले उद्योग वाढविण्यासाठी सत्ता वापरली. बारामतीत मलिदा गॅंगचा वारंवार उल्लेख होतो आहे. पण मी अशा गॅंग कधी निर्माण केल्या नाहीत,असा टोला देखील त्यांनी अजित पवार यांना लगावला.

पक्ष मी काढला, चिन्ह माझे होते. काही लोकांनी वेगळा विचार केला. माझ्या आयुष्यात मी कधी कोर्टात उभा राहिलो नव्हतो. ती वेळ त्यांनी आणली. शरद गोविंदराव पवार या नावाने मला पहिल्यांदा समन्स आले. केंद्र त्यांच्या हातात होते. कोर्टानेही पक्ष व चिन्ह त्या मंडळींचे असल्याचे सांगितले. ही मोठी गमतीची गोष्ट घडली. माझा पक्ष व चिन्ह पळवले .पण जनतेच्या आग्रहाखातर मी पुन्हा जोर बांधल्याचे पवार म्हणाले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे , उमेदवार युगेंद्र पवार हर्षवर्धन पाटिल लक्ष्मण माने यांनी मनोगत व्यक्त केले

सहा महिन्यांपूर्वी सुप्रियाची निवडणूक होती. सुनेत्रा त्यांच्या विरोधात उभ्या राहिल्या. त्यावेळची त्यांची भाषणे बघा त्यावेळी, समोरचे लोक भावनेला हात घालतील. तुम्हाला भावनाप्रधान करतील. डोळ्यात पाणी आणून मते द्या म्हणतील, पण तुम्ही बळी पडू नका असे आवाहन करण्यात आले होते. बरोबर ना?पण कालचे भाषण तुम्ही एकले का, असे म्हणत शरद पवार यांनी चष्मा काढत डोळ्यावरुन रुमाल फिरविला. पवार यांनी अजित पवार यांची यावेळी नक्कल केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Web Title: My parents and brothers never taught me the sin of breaking the house; Sharad Pawar attacked Ajit Dada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.