माझा फोटो वापरला, त्यांना माहिती आहे..., आपलं नाणं चालणार नाही - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 04:42 PM2023-07-05T16:42:17+5:302023-07-05T16:43:26+5:30
माझ्या निवडीचे बॅनर लावले तर शरद पवारांचा देखील फोटो लावावा, अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
पुणे : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात पुणे जिल्ह्याचा महत्वाचा वाटा आहे. कारण पुण्यातून पवारांचे राजकारण सुरु झाले आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीने राजकारणात महाभूकंप झाल्याचे दिसून येत आहे. अजित पवार ३२ आमदार घेऊन उपमुख्यमंत्री झाले. या घटनेने राष्ट्रवादीतच फूट पडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची चांगलीच तंबी झाल्याचे कळत आहे. कोणाला साथ द्यावी याबाबत ते संभ्रमात आहेत. पण काहींनी अजित पवारांना पाठिंबा देत बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. बारामतीत तर भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांना शुभेच्छांचे बॅनर लावले आहेत. पुण्यातही आज अजित पवारांचे बॅनर लावण्यात आले आहेत.
बारामतीत अजित पवार यांच्या सत्तानाट्याच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅनरबाजीने बारामतीकरांचे लक्ष वेधले होते. कारण या बॅनरवरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा फोटो गायब झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्या निवडीचे बॅनर लावले तर शरद पवारांचा देखील फोटो लावावा,असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. त्यानंतर पुण्यात अजितदादांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो दिसून आला आहे. तसेच अजित पवारांच्या कार्यालयातही शरद पवारांचा फोटो लावण्यात आला आहे. अशातच मुंबईत झालेल्या बैठकीत बॅनरबाजीवरून अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ''माझा फोटो वापरला, त्यांना माहिती आहे आपलं नाणं चालणार नाही'' असं शरद पवार म्हणाले आहेत.
बारामतीत पवार कुटुंबीय एकत्र रहावेत
बारामतीकरांनी पवार कुटुंबियांचे एकोप्याचे राजकारण सुरुवातीपासून पाहिले आहे. बारामतीच्या इतिहासात प्रथमच या कुटुंबियांचे एकमेकांच्या विरोधी राजकारण पाहण्याची वेळ बारामतीकरांवर आली आहे. बारामतीत शरद पवारांची रणनीती कशी असेल, ज्या बारामतीच्या बळावर त्यांनी देशात ओळख निर्माण केली. त्यांच्यामुळे बारामती देशाच्या राजकारणात ओळखली जाते. त्या बारामतीचे राजकारण भविष्यात कोणत्या दिशेने जाणार, या विचारानेच बारामतीकर धास्तावले आहेत. बारामतीत पवार कुटुंबीय एकत्र रहावेत, अशीच बहुतांश बारामतीकरांची इच्छा आहे.