दादांमुळेच माझी राजकीय कारकीर्द; खेडचे आमदार अजित पवारांच्या पाठीशी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 09:56 PM2023-07-02T21:56:16+5:302023-07-02T21:56:49+5:30
आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले, मी सद्यस्थितीत अजितदादा पवार यांच्या पाठीशी आहे.
भानुदास पऱ्हाड
शेलपिंपळगाव : विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी रविवारी (दि.२) दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान आपणही अजितदादांच्या पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया खेडचे आमदार दिलीप मोहिते- पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले, मी सद्यस्थितीत अजितदादा पवार यांच्या पाठीशी आहे. माझी राजकीय कारकीर्द घडविण्यातही दादांचा मोलाचा वाटा आहे. राष्ट्रवादीत येण्यापूर्वी मी शिवसेनेत होतो. ११९९ साली सेनेकडून आमदारकीची निवडणूक लढवली. मात्र दुर्दैवाने त्यात माझा पराभव झाला. त्यानंतर अजितदादांनी मला शिवसेनेतून राष्ट्रवादीत सामील करून घेतले. राष्ट्रवादी पक्षात समाविष्ट करून घेतल्यानंतर २००४ साली खेड - आळंदी विधानसभेची त्यांनी उमेदवारी दिली. या निवडणुकीत माझा विजय झाला. त्यामुळे अगदी पहिल्यापासून मी अजित पवार यांच्या विचारांचा आहे.
दरम्यान खेड तालुक्यातील अनेक विकासकामे आमदारकीच्या काळात मंजूर करून ती मार्गी लावली. तालुक्यातील विकासकामे मंजूर करून देण्यात अजित पवारांचा मोलाचा वाटा आहे.
दरम्यान २००९ साली माझी उमेदवारी कापली गेली. त्यावेळी अजित पवारांनी मला फोन केला. तसेच ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. कापलेली उमेदवारी अजितदादांनी मला मिळवून दिली. दादांचा विश्वास सार्थ ठरवत तालुक्यातील जनतेने मला दुसऱ्यांना आमदार केले. अजितदादा कायमच माझ्या सुख दुःखात सहभागी आहेत. त्यामुळे यापुढेही मी अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात माझ्या नावाचे ते विचार करतील असा ठाम विश्वास आहे.