सेवेतून अनेकांनी प्रेरणा घ्यावी असे उदाहरण
अतुल चिंचली
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : समाजसेवेसाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणाऱ्या अनेक महापुरुषांची उदाहरणे आहेत. मात्र आपल्या संसाराचा गाडा ओढवत असतानाही सामाजिक संवेदनशीलता कायम ठेवून काम करणारे सर्वसामान्यही अवतीभोवती पुष्कळ असतात. महिला रिक्षाचालक जयश्री अब्राहम यापैकीच एक. त्यांनी त्यांची रिक्षा अंध आणि अपंगांसाठी मोफत उपलब्ध करुन दिली आहे.
दिव्यांग नागरिकांना दैनंदिन जीवनात प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणी लक्षात घेऊन जयश्री यांनी त्यांची रिक्षा दिव्यांगांसाठी विनामोबदला चालवण्यास सुरुवात केली.
जयश्री या भोसरी येथे पती आणि दोन मुलांबरोबर राहतात. पती-पत्नी दोघेही रिक्षा चालवण्याचे काम करतात. रिक्षा व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो. स्वत: जयश्री गेल्या आठ वर्षांपासून वाहनचालक म्हणून काम करतात. पूर्वी त्या पहिली शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी गाडी चालवायच्या. गेल्या दोन वर्षांपूर्वी त्या रिक्षा चालवतात. रिक्षा चालवताना दिवसातून तीन-चार दिव्यांगांना त्यांना हव्या त्या स्थळी पोहचवते, असे त्यांनी सांगितले.
चौकट
समाधान मोठे
“सहसा करुन सकाळच्या वेळेतच दिव्यांग नागरिक बस स्टॉप अथवा रिक्षा स्टँडवर थांबलेले असतात. त्यावेळी मी स्वतः विचारपूस करून त्यांना हव्या त्या पत्त्यावर सोडते. त्यांना सोडल्यानंतर मिळणारे आशीर्वाद, त्यांच्याकडून होणारे कौतूक हीच माझी कमाई समजते. दिव्यांगाची सेवा करण्याची माझी आधीपासूनची इच्छा रिक्षाच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचे समाधान आहे.”
-जयश्री अब्राहम, रिक्षाचालक