पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) काम करत असताना अनेक भगिनींचा आणि भावांचा मला पाठिंबा आहे. एक मोठा समुदाय माझ्यासोबत आहे. हा समुदाय माझ्यावर नितांत प्रेम करतोय. मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझे अनेक पाठीराखे अक्षरशः रडत आहेत, विनंती करत आहेत. परंतु राजकारणात काही घडामोडी घडत असतात आणि आपल्याला त्या स्वीकाराव्या लागतात, असे सांगत रुपाली पाटील ठोंबरे (rupali thombare patil) यांनी मनसेतून बाहेर पडण्याच्या निर्णय जाहीर केला.
रुपाली पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील आपल्या पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला. पक्षातील काही लोकांच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपण पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पक्षात बदल होत नसेल तर स्वतःमध्ये बदल करून घ्यावा लागेल आणि त्यासाठीच बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान रूपाली पाटील यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहे. त्यांना ट्रोल देखील केले जात आहे. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ट्रोल करणारे, विकृत कमेंट करणारे माझे पाठीराखे असतील तर ते मला नकोय. ट्रोल करणाऱ्यांना मी आधीपासूनच भीक घालत नाही. त्यांच्यावर आधीपासूनच मी कायदेशीर कारवाई करत होते. त्यामुळे ट्रोलर लोकांना मी उत्तर द्यायला सक्षम आहे.