पुणे : मी पुण्याचा आराेग्यप्रमुख असताना एक मंत्री मला पुण्यातील कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलवायचे. नियमबाह्य टेंडर, खरेदी प्रक्रियेची कामे आणि इतर कामांमध्ये मदत करण्यासाठी दबाव आणत असत. ती नियमबाह्य कामे केली नाहीत म्हणून माझे निलंबन करण्यात आले आहे. म्हणून हे निलंबन मागे घ्यावे, असे पत्र महापालिकेचे निलंबित आराेग्यप्रमुख डाॅ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. तसेच निलंबन रद्द करावे, अशी विनंती यातून केली आहे.
या पत्रात डाॅ. पवार यांनी संबंधित मंत्र्याचे नाव घेणे टाळले आहे. त्यामुळे कात्रजमध्ये कार्यालय असलेला ताे मंत्री काेण? त्या मंत्र्यावर मुख्यमंत्री कारवाई करणार का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
डाॅ. पवार यांचे आर्थिक अनियमितता व स्त्री कर्मचारी लैंगिक छळ या जुन्या प्रकरणांची फाईल काढून त्यांना आराेग्य खात्याने निलंबित केले आहे. निलंबनानंतर डाॅ. पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव यांना पत्र लिहिले आहे. संबंधित मंत्र्यांनी नियमबाह्य काम करण्यास नकार दिल्याने महापालिकेचे आरोग्य प्रमुख हे पद रिक्त करण्यासाठी जुन्या तक्रारीचा आधार घेत चौकशी समिती स्थापन करून चौकशी न करताच निलंबन करण्यात आल्याचा दावा डॉ. पवार यांनी केला आहे. याआधीही त्यांची बदली केली हाेती. त्या बदलीविरोधात मॅटमध्ये दावा दाखल केल्याने आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांचे निलंबन केल्याचे बाेलले जात आहे.
पत्रात म्हटले आहे की, सार्वजनिक आरोग्य विभागातील सेवेला ३० वर्षे झाली. उत्कृष्ट काम केल्याने गौरविण्यातही आले. पुणे महापालिका आरोग्य विभागात कार्यरत असताना कोणतीही गंभीर तक्रार नाही. तसेच कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही. महापालिका आयुक्तांनी कामकाजाबाबत प्रतिकूल शेरा दिलेला नाही. माझे कामकाज व सर्व्हिस रेकॉर्ड उत्तम असताना केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून तक्रारींमध्ये तथ्य नसतानाही हेतुपुरस्सरपणे मंत्र्यांच्या दबावामुळे निलंबन केले आहे.