इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शहरातील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत असून, यामुळे नागरिकांना भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी याची खूप मदत होणार आहे. त्याच बरोबर शहर हरित होत असून, यामुळे इंदापूर शहराच्या वैभवात भर पडणार आहे असे प्रतिपादन नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी केले.
माझी वसुंधरा अंतर्गत इंदापूर नगरपरिषदेने इंदापूर शहरातील उपजिल्हा रूग्णालयाच्या परिसरात रविवार ( दि. २७ ) रोजी विविध देशी वृक्षांची लागवड केली असून यात काटेसावर, काटेरीमुकूट, जास्वंद आदींचा समावेश आहे. माझी वसुंधरा अभियान शहरात प्रभावीपणाने राबवण्यात नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. वृक्षारोपण करताना नगराध्यक्षा अंकिता शहा बोलत होत्या. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डाॅ. प्रदीप ठेंगल, नगरसेवक अनिकेत वाघ, कार्यलयीन अधिक्षक वर्षा क्षिरसागर, वैद्यकीय अधिक्षक डाॅ. एकनाथ चंदनशिवे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुहास शेळके, डॉ. विनोद राजपुरे, डाॅ. नामदेव गार्डे, आरोग्य निरिक्षक मनोज बारटक्के, अशोक चिंचकर, लिलाचंद पोळ, अल्ताफ पठाण, सुरेश सोनवणे, गजानन पुंडे, दत्तात्रय ढावरे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी डाॅ. प्रदीप ठेंगल म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यावरण संरक्षित माझी वसुंधरा हा कार्यक्रम राज्यात राबवला जात आहे. यामध्ये इंदापूर नगरपरिषदेने देखील आपला सहभाग नोंदवला आहे. पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि अग्नी या पाच घटकांतर्गत शहरात आपण काम करत आहोत. शहरात विविध ठिकाणी आपण वृक्ष लागवड करत आहोत. आजच्या या वृक्ष लागवड कार्यक्रमात इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ. एकनाथ चंदणशिचे व त्यांचे सर्व कर्मचारी देखील सहभागी झाले होते. नागरिकांना देखील या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवून आपले शहर हरित आणि सुंदर बनवण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
_______________________________________
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करताना मान्यवर
२७ इंदापूर