कोरोना लाटेचा दुसरा टप्पा हा पहिल्या टप्प्यापेक्षा जास्त धोकादायक ठरला. सर्व पातळ्यांवर (वैद्यकीय व प्रशासकीय) त्याने आपला अक्षरश: घाम फोडला. खूप परीक्षा पाहिल्यावर आता काही प्रमाणात दुसऱ्या टप्प्याचे संकट आटोक्यात येत आहे, असे चित्र निर्माण होत असतानाच म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले. याचा अंदाज होईपर्यंत वाऱ्याच्या वेगाने हा आजार बळावला आणि अनपेक्षितरीत्या अनेक रुग्णांचे प्राण घेऊ लागला. याच्यावर उपचारपद्धती आणि याचे स्वरूप हे सर्वसामान्यांना लक्षात येऊन वैद्यकीय सल्ला घेण्यापर्यंतचा काळसुद्धा अनेक रुग्णांसाठी काळ ठरू लागला. याच्याबद्दल जनमानसात अनेक समज-गैरसमज निर्माण झाले, त्यामुळे यावर प्रभावी उपचार करण्यासाठी याबद्दल जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
काही आजार हे विषाणुजन्य असतात, त्याला आपण शास्त्रीय भाषेत व्हायरल असे म्हणतो. काही आजार जीवाणुजन्य असतात त्याला आपण बॅक्टेरियल असे म्हणतो. काही आजार हे बुरशीजन्य असतात त्यांना आपण फंगल असे म्हणतो. हा आजार बुरशीजन्य या प्रकारातला आहे (फंगल).
या आजाराबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे.
१) हा आजार कोरोनाच्या आधीपासूनचा आहे.
२) बोलीभाषेत यालाा काळी बुरशी (ब्लॅक फंगस) असे म्हणतात.
कारणे :
१) मुक्यार मायर्सोटिस या गटातल्या बुरशीजन्य सूक्ष्म जंतूमुळे होतो.
२) प्रत्येक कोरोना पेशंटला होतोच असे नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.
३) विशेषत: मधुमेही व्यक्ती कोरोनाबाधित झाल्यास शक्यता जास्त.
४) उपचारादरम्यान अतिरिक्त स्टिरॉईडचा वापर.
५) कोणत्याही कारणाने रोगप्रतिकारशक्ती कमी असणे विशेषत: एच.आय.व्ही, कॅन्सर, टी.बी., किडनी व लिव्हर ट्रान्सप्लांटचे रुग्ण, डायलेसिसचे रुग्ण.
६) खूप काळ आय.सी.यू.मध्ये असणारे विशेषत: हाय फ्लो ऑक्सिजन थेरपीचे रुग्ण.
७) ऑक्सिजन थेरपी चालू असताना, ऑक्सिजनची नळी ही एका विशिष्ट प्रकारच्या पाण्याच्या बाटलीत बुडवून तो आर्द्र करून दिला जातो. त्याला ह्युमिडी फायर असे म्हणतात. या बाटलीतील पाणी हे शुद्ध स्वरूपात असणे अपेक्षित असते. त्याचे निर्जंतुकीकरण योग्य प्रकारे न झाल्यास त्यातून बुरशीजन्य जंतू आत जाऊ शकतात.
८) आय.सी.यू. /हॉस्पिटलचे एसीचे डक्ट वेळोवेळी निर्जंतुक करणे आवश्यक.
९) पेशंट घरी असताना शक्यतो एसी, वाळ्याचे पडदे टाळणे आवश्यक.
१०) खूप दिवस कृत्रिम अन्ननलिका असणारे पेशंट
* लक्षणे
डोकेदुखी, डोळे दुखणे, वस्तू दोन दिसणे (डिप्लोपिया), दृष्टी कमी होणे, डोळ्यातून स्राव येणे, टाळूवर काळपट तपकिरी रंगाचा अल्सर दिसणे, दात व हिरड्यातून रक्तस्राव व पूस्राव होणे, सायनस वेदना, नाकातून काळपट तपकिरी रंगाचा स्राव/रक्तस होणे.
५) याचा प्रवास :
दात-हिरड्या, टाळू, सायनस, नाक, नाकामागील पोकळ्या, डोळे आणि मेंदू याचा वेग कर्करोगापेक्षा जलद आहे.
६) तपासण्यात :
ब्लड टेस्ट, नाकातील द्रावांची, टाळूवरील पापुद्रांची तपासणी (एचपीई, केओएच ब्लोिटंग) नाकाची दुर्बिणीद्वारे तपासणी (नाशल एंडोस्कोपी), एमआरआय, सीटी स्कॅन.
७) औषधोपचार :
१) लक्षणे जाणवल्यास त्वरित फॅमिली डॉक्टरकडे जाणे व त्यांच्या सल्ल्याने कान, नाक, घसातज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, दंततज्ज्ञ, मेंदूतज्ज्ञ यांचा सल्ला घेणे.
२) सुरुवातीच्या काळात ॲम्फोटीरिसीयन-बी सारख्या इंजेक्शनचा फायदा होऊ शकतो ; पण आजार बळावल्यास सर्जिकल डिबियडमेंट(पापुद्र काढून टाकणे), शस्त्रक्रिया, गरज पडल्यास डोळा काढावा लागतो.
३) रुग्णांनी आपल्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे अतिआवश्यक.
४) हा आजार मेंदूपर्यंत गेल्यास स्ट्रोक, मेनिनजायटीस असे आजार होतात. यावेळेस न्यूरोलॉजिस्टची मदत आवश्यक.
काही महत्त्वाच्या गोष्टी :
१) याला साथ रोग म्हणून जाहीर करून साथ रोग कायदा १८९७ अन्वये यामध्ये याचा समावेश केला जावा, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
२) १७ मे रोजी राज्य शासनाने या आजारांसोबत लढण्यासाठी मार्गदर्शकतत्त्वे जाहीर केली आहेत; पण ती खेडोपाडी काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, सिस्टर, वॉर्डबॉय, वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
३) सध्या या आजाराचा भाऊ व्हाईट फंगस (पांढरी बुरशी) यांने पण आता डोके वर काढले आहे.
४) यावरील उपचारासाठी उपयोगी असणारे इंजेक्शन, औषधे यांचा तुटवडा जाणवू लागल्याने त्याचा काळाबाजार सुरू झाला आहे. त्यामुळे यावर प्रशासकीय यंत्रणांचे नियंत्रण आवश्यक.