पुणे: सासवडजवळ पत्नीचा खून करुन मृतदेह टाकून दिल्यानंतर कात्रज घाटात मुलाचा गळा दाबून खुन करुन मृतदेह फेकून दिला. त्यानंतर सातारा रोडवर भाड्याने घेतलेली कार सोडून दिलेली आढळून आली. दोन खुनानंतरही पती अबिद शेख याचा अद्याप काहीही तपास लागू शकला नाही. पुणे शहर पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत असून त्याच्या तपास लागल्यावरच या मागील नेमके गुढ उलघडण्याची शक्यता आहे.
प्राथमिक अंदाजानुसार ग्रामीण पोलीस व शहर पोलिसांचा पती अबिद शेखवर संशय आहे.आलिया शेख (वय ३५) आणि आयन शेख (वय ६) असे खुन झालेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आबिद शेख हे मुळचे मध्य प्रदेशातील विदिशा येथील राहणारे आहेत. काही वर्षांपूर्वी ते पुण्यातील धानोरी, विमाननगर भागात रहात आहेत. अबिद शेख हा एका विमा कंपनीत मॅनेजर आहे. ११ जूनला हे तिघे जण भाड्याने कार घेऊन पिकनिकला गेले होते. त्यानंतर अबिद शेख याने भाड्याने घेतलेल्या कारचा कालावधी आणखी दोन दिवस वाढवला. सोमवारी रात्री ९ वाजता अबिद शेख याने आपल्या विदिशा येथील नातेवाईकांना फोन करुन आम्ही अर्धा तासात घरी पोहचत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला. दुसर्या दिवशी मंगळवारी सकाळीही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे विदिशातील नातेवाईकांनी ही बाब पुण्यात राहणार्या त्यांच्या चुलत भावाला सांगितली. ते शेख यांच्या घरी गेले तर तेथे घराला कुलूप आढळले.
अबिद शेख खून करून पळून गेला; पोलिसांचा संशय
अबिद शेख यांना भाड्याने कार देणार्या कंपनीचे अधिकारीही तेथे आले होते. त्यांचाही शेख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शेवटी त्यांनी कारवरील जीपीएस यंत्रणेद्वारे तिचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती कार सातारा रोडवरील एका चित्रपटगृहाबाहेर विरुद्ध दिशेला ही कार पार्क केल्याचे आढळून आले. सहकारनगर पोलिसांनी या कारची पाहणी केल्यावर त्यात काही रक्ताचे डाग दिसून आले. दरम्यान, सासवडजवळील खळद येथे एका महिलेचा मृतदेह मंगळवारी आढळून आला होता. त्याचवेळी सायंकाळी कात्रज बोगद्याजवळ मुलाचा मृतदेह आढळून आला. हे दोघेही आई व मुलाचे मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्याचवेळी अबिद शेख यांचे काय झाले, याचा तपास लागू शकला नाही.
अबिद शेख याने पत्नी व मुलाचा खून केला. त्यानंतर सासवड जवळ पत्नीचा मृतदेह टाकून दिला. तेथून तो कारने कात्रज घाटात आला. तेथे मुलाचा मृतदेह टाकला. त्यानंतर तो सातारा रोडवर आला. तेथे गाडी पार्क करुन तो कोठेतरी पळून गेला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. अबिद शेख यानेच दोघांचा खून केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यादृष्टीने पोलीस शहरातील सीसीटीव्हींचे फुटेजची तपासणी करीत आहेत. याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले की, महिलेची ओळख पटली असून तिचा पती अद्यापही बेपत्ता आहे. त्यानेच हे दोन्ही खुन करुन तो पसार झाला असावा, असा संशय आहे. तो सापडल्यानंतर यावर अधिक खुलासा होऊ शकेल.