चाकण : कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील आकाश संदीप महाळुंगकर या १३ वर्षांच्या मुलास अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.७२ तास उलटूनही अद्याप पोलिसांच्या हातात आरोपींचा कुठलाही सुगावा लागलेला नाही. त्याच्या हत्येचे गूढ अद्याप कायम आहे. आरोपी अद्याप मोकाटच असून आरोपींना त्वरित पकडून कारवाई करण्याची मागणी महिला दक्षता समितीच्या सदस्या, सरपंच रत्नमाला गाळव, माजी सरपंच कैलास गाळव, नातेवाईक व ग्रामस्थांनी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दोनच्या सुमारास कोरेगाव खुर्द येथील टोकवाडी वस्तीवरील आकाश महाळुंगकर हा घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या टेकडीवर शौचाला गेला असता दोन अज्ञात तरुणांनी त्यास पकडून अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. त्यानंतर आकाशने आरडाओरडा केल्यानंतर वस्तीवरील नागरिकांनी त्यास विझविण्याचा प्रयत्न केला; पण तोपर्यंत आकाश ९० टक्के भाजला होता. काल सायंकाळी ६ च्या सुमारास आकाशची ससून रुग्णालयात उपचार चालू असताना प्राणज्योत मालवली. आकाशच्या मृत्यूमुळे कोरेगाववर शोककळा पसरली असून आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला. पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय मगर, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चाकणचे पोलीस निरीक्षक दगडू पाटील यांच्या मार्गदशर्नाखाली आळंदीचे सहायक पोलीस निरीक्षक कुमार कदम, हवालदार अनंता शिंदे, एम. एम. शेख, राजेश मोहिते, राजेंद्र कोणेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस अधिकारी व महिला दक्षता समितीच्या उपाध्यक्षा मंगल देवकर, सदस्या रमा हुलावळे व शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुख नंदाताई कड यांनी घटनास्थळाची पाहणी करून आकाशची आई, बहीण व शिक्षक यांच्याकडे आकाशच्या वर्तणुकीची चौकशी करून आरोपींना त्वरित पकडून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर काही गोष्टी संशयास्पद वाटत असून आकाशच्या मारेकऱ्यांना पकडणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या घटनेबाबत मात्र गावात उलटसुलट चर्चा असल्याचे चित्र आज दिवसभर गावात दिसत होते. (वार्ताहर)