पुणे : बोपदेव घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडले असून, यात मुलानेच दोरीने गळा आवळून बापाचा खून केल्याचे समोर आले आहे. दारू पिऊन पत्नी आणि मुलाला सतत मारहाण करणाऱ्या कामगाराच्या मुलाने मावस भावाच्या मदतीने बापाचा काटा काढला. खुनानंतर मृतदेह बोपदेव घाटातील ‘सेल्फी पॉइंट’जवळ फेकून देण्यात आला. मध्य प्रदेशात मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन मावस भावांना कोंढवा पोलिसांनी स्टेशन परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पवन देबू शर्मा (वय ४०, रा. मानाजीनगर गणपती मंदिर समोर, नऱ्हे) असे खून झालेल्या मिस्त्री कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सोनू पवन शर्मा (वय २५) आणि शैलेंद्र गोवर्धन अहिरवार (वय २२) यांना अटक केली आहे. दरम्यान, खुनाची घटना १४ जूनला सायंकाळी पावणेसातच्या सुमारास उघडकीस आली होती. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी शर्मा याची घरी जाऊन माहिती घेतली असता तेथे मिस्त्री काम करणारा शर्मा, त्याची पत्नी आणि मुलगा सोनू राहत होते, अशी माहिती मिळाली. तसेच त्याच्या घरी पत्नीच्या बहिणीचा मुलगा शैलेंद्र हा वास्तव्याला होता. शर्माच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार सोनू आणि शैलेंद्र घरी परतले नव्हते. त्यावरून पोलिसांना संशय आला.
पोलीस नाईक तुषार आल्हाट यांना सोनू आणि शैलेंद्र मध्य प्रदेशातील मूळ गावी जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शर्माला दारू पिण्याचे व्यसन होते. तो दारू पिऊन पत्नी आणि मुलगा सोनू याला मारहाण करीत होता. मावसभावाच्या समोरच बापाने मारहाण केल्याचा राग सोनूच्या मनात होता. त्यातून सोनूने शैलेंद्रच्या मदतीने बापाचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून तसेच डोक्यात हत्याराने वार करून खून केला.
मृतदेह बोपदेव घाटातील ‘सेल्फी पॉइंट’जवळ फेकून दिला. कोंढवा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, हवालदार सतीश चव्हाण, पोलीस नाईक नीलेश देसाई, गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार, तुषार आल्हाट, अंमलदार लक्ष्मण होळकर, विशाल ठोंबरे, सागर भोसले आणि संतोष बनसुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.