पुणे : गुजरातचे मुख्यमंत्री असताना ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ अशी घोषणा केली होती. त्यानंतर पंतप्रधान झाल्यावर ‘ना थकता हूं ना थकने देता हूं’ असे सहज स्वर्गीय अरुण जेटली गमतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून म्हणाले होते आणि यावर एकच हशा पिकला होता. तर नवरात्र असल्याने उपवासाचे दिवस होते. त्या दरम्यान पंतप्रधानांना अमेरिकेचा दौरा करावा लागला. उपवासादरम्यान मोदींनी १०० तासांत ५० कार्यक्रम केले. एवढा कार्यक्षम नेता माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला, असे मत भाजपा नेते तथा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
ते संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आँख ये धन्य है’ आणि ‘साक्षी भाव’ या पुस्तकांमधील कवितांवर आधारित ‘मन का गीत’ या विशेष कार्यक्रमावेळी बोलत होते. यावेळी मोनिका मुरलीधर मोहोळ, प्रसिद्ध रंगकर्मी आणि कार्यक्रमाचे दिग्दर्शक योगेश सोमण, संगीत संयोजक डॉ. सलील कुलकर्णी, संवाद पुणेचे सुनील महाजन, माजी नगरसेवक आदित्य माळवे, माधवी सहस्त्रबुद्धे, उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशी, नृत्य दिग्दर्शक निकिता मोघे आणि ‘मन का गीत’ कार्यक्रमाची संहिता लिहिलेल्या डॉ. माधवी वैद्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील महाजन यांनी केले.
प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले की, मोदी हे अत्यंत संवेदनशील व्यक्ती असल्याने त्यांच्याकडून काव्यनिर्मिती झाली आहे. ते संन्यस्त कर्मयोगी आहेत. समोरील व्यक्तीचे म्हणणे प्रतिवाद न करता शांतपणे ऐकून घेणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य असून त्यांची कार्यक्षमता अफाट आहे. पंतप्रधान म्हणूनच नव्हे, तर एक संवेदनशील कवी म्हणून मी त्यांना जवळून पाहिलेले आहे.
दिग्दर्शनाची बाजू अभिनेते योगेश सोमण यांनी सांभाळली. नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीत संयोजन केले आहे. प्रभावी अभिवाचन सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जमेनिस आणि अक्षय वाटवे यांनी केले. विविध गीते, कवितांवर शिल्पा दातार, शर्वरी ओतरी, श्रुतिका अत्रे, अदिती देवधर, ईश्वरी बापट, प्राजक्ता सांभू, अंतरा बोरगावकर यांनी नृत्याविष्कार सादर केला. महेश लिमये (दृकश्राव्य), अक्षर वडके (प्रकाश योजना), अमन वरखेडकर (की बोर्ड) यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी, तर संयोजन केतकी महाजन-बोरकर यांनी केले.
कविता संगीतबद्ध करता आल्या हे भाग्य : डॉ. सलील कुलकर्णी
फार चांगला योग आहे. कारण पंतप्रधानांच्या कवितांना संगीतबद्ध करता आले. अनेक प्रकारच्या कविता आपण वाचतो. पण अनेक शब्द मला या कवितांच्या माध्यमातून समजली. भारतासह परदेशात भ्रमंती करणारे आणि अनुभव पाठीशी घेऊन त्यातून कविता साकारल्या गेल्या आहेत. यात शैक्षणिक, नैसर्गिक आणि हिंदुत्व अशा सर्व गोष्टी दिसतात. तसेच कवितांच्या माध्यमातून त्यांची संवेदनशीलता समजली.