‘नॅक’मार्फत दर पाच वर्षांनी विविध निकषांच्या आधारे शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन तपासले जाते. मात्र, शुल्क अधिक असल्याने काही संस्था मूल्यांकनासाठी सामोरे जात नव्हत्या. नॅकतर्फे महाविद्यालयांचे मूल्यांकन शुल्क कमी करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाठपुरावा केला. आता नॅकने शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मूल्यांकन प्रक्रियेसाठी नॅककडून महाविद्यालय व संस्थानिहाय वेगवेगळे शुल्क आकारले जाते. नॅक मूल्यांकनाचे एकूण शुल्क सुमारे सव्वाचार लाख रुपये होते. परंतु आता हे शुल्क एक लाख ३०० रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे मूल्यांकनासाठी महाविद्यालयांना एकूण ३ लाख २४ हजार ५०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे, असे राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी सांगितले.
नॅक मूल्यांकनाचे शुल्क कमी झाल्यामुळे राज्यातील सर्व महाविद्यालयांनी या मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करून डॉ. माने म्हणाले, राज्यातील १५ अकृषी विद्यापीठांपैकी १४ विद्यापीठांचे नॅक मूल्यांकन झाले आहे. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ मूल्यांकनासाठी आता पात्र झाले असून, राज्यातील दहा अकृषी विद्यापीठे नॅक पुनर्मूल्यांकन व मानांकन प्रक्रियेत सहभागी झाले आहेत, असेही माने यांनी सांगितले.