यंदा महिलांनी फेर धरला नाहीच; झिम्मा- फुगडीचा खेळ रंगला नाही
----
काटेवाडी : कोरोनाचा कहर तुलनेने कमी झाला असला आणि लॉकडाऊनचे निर्बंध तुलनेने कमी झाले असले तरीही यंदाच्या नागपंचमी सणावर कोरोनाचे विरजन दिसून आले. दरवर्षीप्रमाणे पंचमीनिमित्त महिलांनी ना फेर धरला ना झिम्मा फुगडीचा खेळ रंगला होता. मात्र महिलांनी भाऊ मानलेल्या नागोबाची पूजा करून नागपंचमीची परंपरा जपण्याचा प्रयत्न केला.
नववधूने पहिली पंचमी माहेरी साजरी करण्याची रीत आहे. मात्र कोरोनामुळे शक्यताे प्रवास टाळण्याची दक्षता अनेकांनी घेतल्यामुळे नववधूंनाही हा सण सासरी साजरा करावा लागला. हिंदू धर्मात श्रावण महिन्यातील हा पहिलाच सण असल्याने या सणाला मोठे महत्त्व आहे. अगदी शाळेत जाणाऱ्या चिमुरड्यांपासून ते मोठ्या आजीबाई हा सण उत्साहाने साजरा करतात. शाळा-महाविद्यालयातील मुली एकत्र येऊन मेंदी काढण्यापासून नटून-थटून फिरतात. मात्र यंदा मेंदी काढली गेली तरी नटून-थटून फिरतानाची दृष्य क्वचितच नजरेस पडली.
नागपंचमीनिमित्त विविध सोसायट्यांमध्ये किंवा संस्था संंघटनाच्या वतीने मोठा झोका बांधला जायचा. त्यावर परिसरातील महिलांकडून झोका खेळण्यासाठी गर्दी व्हायची, मात्र यंदा गर्दी टाळायची असल्यामळे ना झोका बांधला गेला नाही गर्दी झाली. त्यामुळे सणाच्या निमित्ताने घरात गोडधोड जेवण आणि महिलांची मेंदीच्या कार्यक्रम झाला असला तरी उत्साहावर कोरोनाचे विरजन दुसऱ्या वर्षी कायम राहिलेले दिसले.
---