पुणे : कोरोनामुळे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनासंबंधी साहित्य महामंडळाने पावली उचलली आहेत. उद्या (दि.३) औरंगाबाद येथे संमेलनाविषयी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. संमेलनासाठी आलेल्या चार निमंत्रणामध्ये महामंडळाची नाशिकला संमेलन घेण्याची इच्छा आहे तर पुण्याकडून दिल्लीच्या स्थळाचा आग्रह धरला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
साहित्य महामंडळाकडे आगामी संमेलनासाठी नाशिकडून २, अंमळनेर आणि दिल्ली अशा ठिकाणांहून संमेलनासाठी निमंत्रणे आली आहेत. नुकतेच सरहद्द संस्थेने दिल्लीला मे च्या दरम्यान संमेलन आयोजित करण्याची तयारी असल्याचे पत्र दिले आहे. पुण्यातून दिल्लीला झुकत माप आहे मात्र महामंडळाला कुसुमाग्रजांच्या भूमीत नाशिकला संमेलन घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे बैठकीत नाशिक की दिल्ली या दोन स्थळांचाच अधिक विचार होण्याची शक्यता आहे. या बैठकीत स्थळ निवड समिती स्थापन करून ती स्थळांची अधिकृतपणे पाहणी करेल त्यानंतरच संमेलन स्थळावर शिक्कामोर्तब होईल.
...
संमेलनाध्यक्ष पदासाठी भारत सासणे, रवींद्र शोभणे इच्छुक; प्रभा गणोरकर, प्रा. जनार्दन वाघमारे यांच्या नावाचा आग्रह
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड दोन वर्षांपासून निवडणूक प्रक्रिया न राबविता बिनविरोध केली जात आहे. ९४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी भारत सासणे, रवींद्र शोभणे इच्छुक आहेत. विदर्भाकडून ज्येष्ठ लेखिका प्रभा गणोरकर यांचे नाव सुचविले जाण्याची शक्यता आहे तर डॉ. जनार्दन वाघमारे यांचेही नाव मसापकडे सुचविले आहे असल्याचे समजते.