पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठात चित्रीकरणासाठी उभारलेला सेट मोठा नाही. तो काढण्यासाठीही बराच कालावधी लागेल, असे सांगत प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी विद्यापीठातून सेट हलवणार असल्याचे संकेत दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर योग्य प्रक्रिया पार न पाडल्यामुळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेट लावण्यास परवानगी देण्यावर राज्य शासनाकडून गंभीर आक्षेप घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर, त्याला ७ दिवसांत सेट काढून घेण्याचे निर्देश कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिले होते. मात्र, त्याला १२ दिवस उलटून गेले तरी मैदानातील सेट हलविण्याबाबत कोणत्याही हालचाली सुरू करण्यात आलेल्या नाहीत. नागराज मंजुळे यांना विद्यापीठातील मैदान दीड महिन्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार डिसेंबरपर्यंत त्यांनी मैदान रिकामे करणे अपेक्षित होते. मात्र, ४ महिने उलटले तरी अद्याप चित्रपटाचे शूटिंग सुरू झालेले नाही. विद्यापीठानेही नियमानुसार कुठलीही प्रक्रिया पार पाडली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विद्यापीठ प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून मैदान रिकामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ८ फेब्रुवारी रोजी कुलगुरूंनी तातडीने नागराज मंजुळे यांना नोटीसही बजावली. मात्र, तरीही दिलेल्या मुदतीत मैदानातून चित्रपटाचा सेट हलविण्यात आलेला नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नागराज मंजुळे यांनी उभारलेला शूटिंगचा सेट हटवण्याचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदा मौन सोडले. पुढील दोन दिवसांमध्ये सेटसंदर्भात माध्यमांसमोर ते भूमिका मांडणार आहेत.