पुणे :पुणे शहरातील मेट्रोच्या वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली आणि खडकवासला ते खराडी, पौड फाटा ते माणिकबाग या मेट्रोच्या नव्या मार्गांना पालिकेच्या स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने मंजूर केलेले ठराव महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. त्यामुळे आता हे ठराव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी जाणार आहेत.
वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली आणि खडकवासला ते खराडी, पौड फाटा ते माणिकबाग या मेट्रोच्या नव्या मार्गांच्या सर्वंकष प्रकल्प आराखड्यास (डीपीआर) स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव १४ ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला आहे. त्यामुळे महापालिकेकडून मेट्रोच्या विस्तारित टप्प्याला मान्यता देण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिका व महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात महापालिकेने हे ठराव महामेट्रोकडे सुपूर्द केले.
मेट्रो स्थानकांच्या परिसरातील वाहनतळासाठी समिती
मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील सविस्तर प्रकल्प अहवालात दर्शविण्यात आलेल्या मार्गिकांमध्ये नंतर काही बदल केले गेले. त्यामुळे आता या मार्गिकांवर स्थानकांलगत वाहनतळाची जागा निश्चित केली जाणार आहे. त्यासाठी महापालिका व महामेट्रोच्या प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात येईल. ही समिती प्रत्यक्ष जागांची पाहणी करून वाहनतळासाठीची जागा निश्चित करेल. जागा निश्चित झाल्यानंतर महामेट्रोतर्फे वाहनतळ विकसित केले जाईल व त्यातून मिळणारे उत्पन्न महापालिका व महामेट्रो विभागून घेतील, अशी माहिती प्रकल्प विभागप्रमुख श्रीनिवास बोनाला यांनी दिली.
पालिकेने केलेल्या खर्चाची रक्कम वगळून मेट्रोला पैसे देणार
मेट्रो प्रकल्पातील पालिकेच्या हिश्श्यापोटी महापालिकेने महामेट्रोला १५० कोटी रुपये देणे आहे. मात्र, मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी महापालिकेने केलेली ‘जी २०’ बैठकांच्या काळात केलेले सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, सांडपाणी व्यवस्था, पदपथ दुरुस्ती यासाठी आलेल्या खर्चाची रक्कम त्यातून वजा करून उर्वरित रक्कम महामेट्रोला देण्यात येणार आहे, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.