लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तिसऱ्या ‘सोलारीस करंडक’ वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या ६५ वर्षांवरील गटात पुण्याच्या अनिल नाईक, मुंबईच्या अनुप डे, इंदौरच्या अब्दुल हनिफ, हैदराबादच्या एम. सुरेश, हैदराबादच्या ए.आर. राव यांनी विजय मिळवत स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस गाजवला.
सोलारीस क्लब, मयुर कॉलनी येथे आणि डेक्कन जिमखाना क्लब येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत ६५ वर्षावरील गटाच्या मुख्य ड्रॉच्या पहिला फेरीत पुण्याच्या अनिल नाईक याने सतिश लाखेकर यांचा ६-०, ६-१ असा सहज पराभव केला. मुंबईच्या अनुप डे याने घनश्याम पटेल याच्यावर ६-४, ६-२ अशी मात करून दुसरी फेरी गाठली. इंदूरच्या अब्दुल हनिफ याने हरयाणाच्या कुलवंत राऊत याचा ६-१, ६-० असा सरळ सेटमध्ये पराभव केला. हैदराबादच्या एम. सुरेश याने अलोक कुमार सेन याचा ६-०, ६-० असा एकतर्फी पराभव केला. हैद्राबादच्या ए.आर. राव याने पुण्याच्या एन. व्ही. खाडेकर याचा ६-२, ६-० असा पराभव करून आगेकूच केली.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर ३५ वर्षावरील गटात मुख्य ड्रॉसाठीच्या पात्रता फेरीचे सामने झाले. यामध्ये पुण्याच्या केतन धुमाळ याने महेश मर्डाशीचा ८-२ असा सहज पराभव केला. अभिषेक चव्हाण याने पार्थ मोहपात्राचा ८-२ असा पराभव करून आगेकूच केली. पृथ्वीराज इंगळे, कैफी, आनंद गुप्ता आणि विकास शिगवणे यांनीही आपली विजयी घोडदौड कायम ठेवली.
स्पर्धेचे उद्घाटन सोलारीचे संचालक जयंत पवार आणि सोलारीस क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली यांच्या हस्ते करण्यात आले.