आंदोलनाच्या ठिकाणी खिळे ठोकणे? हे केंद्र सरकारला शोभतं का? अजित पवारांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 12:45 PM2021-02-05T12:45:51+5:302021-02-05T12:46:25+5:30
आंदोलक काय पाकिस्तान, चीन, बांगलादेशमधून आलेत का?
पुणे : शेतकरी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करत असताना तुम्ही खिळे ठोकता? ही पद्धत आहे का ? आंदोलक काय पाकिस्तान, चीन, बांगलादेशमधून आलेत का? असा संतप्त सवाल विचारत राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार सोबतच्या चर्चेच्या तब्बल ११ फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. मात्र प्रजासत्ताक दिनी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. मात्र त्यानंतर देखील शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याबाबत ठाम असून आता भारतीय किसान युनियनने 5 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय, राज्य महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व दिल्ली पोलीस यांनी आक्रमक पावले उचलली आहेत. विविध रस्त्यावर पोलीस , सुरक्षा दल यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यासोबतच खिळे देखील ठोकले आहे. याच मुद्द्याचा संदर्भ घेत अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर कडाडून टीका केली आहे.
पवार पुढे म्हणाले, शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलनाला बसले असताना, त्यावेळी मत मांडायला कोणी रोखलं होतं ? परदेशी सेलिब्रिटींनी आंदोलनावर बोलणे हा त्यांचा अधिकार असून त्यात गैर काहीच नाही. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना जगात काही ठिकाणी घडत असतील, तर त्यावर बोलले जातेच ना असाही प्रश्न त्यांनी विचारला.
भाजपच्या वीजबिल आंदोलनावर अजित पवारांची टीका
विरोधकांकडून विनाकारण गैरसमज पसरवण्याचे काम सुरु आहे. आपण पन्नास टक्के वीज बिल माफ केले. त्यावरील व्याज आणि दंड व्याज देखील माफ केले आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून वीजबिल आंदोलन करण्यात येत असल्याची टीका यावेळी अजित पवारांनी केली आहे.
फडणवीसांनी आधी केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करायला सांगावे मग आम्ही विचार करू
राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी करून दरवाढ कमी करावी असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. त्यावर अजित पवारांनी देवेंद्र फडणीस यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना फडणवीसांनी आधी केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करायला सांगावे मग आम्ही विचार करू असे भाष्य केले आहे.