जेजुरी : पुणे जिल्ह्यातील धरणे आता ओव्हरफ्लो होऊन वाहात असताना पुरंदर तालुक्यातील एकमेव मोठे धरण असणारे नाझरे जलाशय आजही निम्मेही भरले नसल्याने तालुक्यात मोठी चर्चा आहे. नाझरे जलाशयात आजअखेर केवळ ४१ टक्केच पाणीसाठा झालेला आहे. राज्यासह पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसाने सर्व जलाशये, धरणे भरून वाहू लागली आहेत. नद्यांनीही उग्र रूप धारण करून वाहण्यास सुरुवात केली आहे. मात्र समुद्रसपाटीपासून सर्वांत उंच असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील कऱ्हा नदीला मात्र अजूनही मोठा पूर आलेला नाही. यामुळे जलाशयात पाणीसाठाही झालेला नाही. पुरंदर तालुक्याची पावसाची सरासरी ४७५ मिमी आहे, आजअखेर सरासरी केवळ २७६ मिमी एवढाच पाऊस पडलेला आहे.नदीवरील तालुक्यातील सर्वांत मोठे धरण नाझरे धरण आहे. जिल्हाभरातील धरणांप्रमाणे हे ही धरण पूर्ण क्षमतेने भरेल अशी अपेक्षा होती, मात्र ती अजूनही पूर्ण होऊ शकलेली आहे. यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रात आजही चिंतेचे वातावरण आहे. सुमारे ७८८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमतेच्या नाझरे जलाशयावरून निम्मा पूर्व पुरंदर आणि बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील १६ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्याचबरोबर पुरंदर आणि बारामती तालुक्यातील सुमारे १३०० हेक्टर लाभक्षेत्राला शेतीसाठी पाणी दिले जाते. वर्षाला रब्बी व खरीप आवर्तने दिली तर साधारणपणे २०० ते २५० दशलक्ष घनफूट एवढे पाणी शेतीला द्यावे लागते. शिवाय पिण्याच्या पाण्याच्या विविध योजना आहेतच. आज जलाशयात केवळ ३२५ दशलक्ष घनफूट एवढाच पाणीसाठा होऊ शकलेला आहे. (वार्ताहर)
नाझरे मात्र अद्याप निम्मेच...
By admin | Published: October 05, 2016 1:44 AM