पुणे : पावसाळ्यापूर्वी झालेल्या कामांची माहिती घेण्यासाठी बाहेर पडलेल्या महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमोरच शहराच्या नालेसफाईचा भंडाफोड झाला. घोले रस्ता, शहराचा मध्यवर्ती भाग आणि सिंहगड रस्ता परिसरात झालेल्या या पाहणीत अनेक ठिकाणी नाल्यांमध्येच राडारोडा आणि कचरा टाकल्याचे दिसून आल्यानंतर कुमार यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच तातडीने ही कामे पुन्हा एकदा करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या कागदी नालेसफाईचा घाट पुन्हा एकदा समोर आला आहे. रविवारी शहरात जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पुन्हा एकदा पाणी साचले होते. तर काही नाल्यांच्या परिसरातही पाणी साचले होते. याची माहिती घेऊन महापालिका आयुक्तांनी आज घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय, तसेच टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसह या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांच्या नाल्याची पाहणी केली. सह महापालिका आयुक्त सुनील केसरी, मधुकांत गरड, क्षेत्रीय अधिकारी माधव जगताप, जयंत भोसेकर, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप या वेळी उपस्थित होते.
आयुक्तांसमोरच नालेसफाईचा ‘भंडाफोड’
By admin | Published: June 09, 2015 5:53 AM