पुणे : काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहिद झाले. हा हल्ला देशाच्या लोकशाहिवरील हल्ला आहे. मुस्लिम समाज या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. भारतात आराजक माजवू पाहणाऱ्या पाकिस्तानचा डाव कदापि यशस्वी होणार नाही. हल्ले करणारे खरे मुस्लिम असूच शकत नाहीत, कारण मुस्लिम समाज शांतताप्रिय समाज आहे. त्या ४० कुटुंबांसोबत आमच्या संवेदना आहेत. त्यांना स्वर्ग प्राप्त होवो अशी दुवा मुस्लिम समाजाच्यावतीने पढण्यात आली.
मुस्लीम बांधवांनी मार्केटयार्ड येथील नूर - ए - हिरा मस्जिदमध्ये शुक्रवारच्या नमाजनंतर शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पित केली. मौलाना फारूक सहाब यांनी शहिद जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दुवा केली. फारुख साहब म्हणाले, मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र कुराणमध्ये असे लिहिले आहे की, तुम्ही जर एखादा मानवतेचा बळी घेतला तर तो इस्लाम धर्मीय असू शकत नाही. इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी असे म्हटले आहे की, जो कोणी व्यक्ती असे विध्वंस करत असतील तर इस्लाम अशा गोष्टीसाठी कधीही मान्यता देणार नाही.
या कार्यक्रमाचे आयोजन बंधूभाव-भाईचारा फाऊंडेशनचे अध्यक्ष शब्बीर भाई , सचिव यासीन शेख, हाजी जकीरीया मेमन, बाझील शेख, अराज शेख, आफ्फार सागर, सादिकभाई, मुक्तार शेख, जुभाई सय्यद, तोफेलभाई शेख, नदीमभाई शेख, सोहेल इनामदार, जावेद शेख आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते. सर्व शहिद जवानांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.
आवश्यकता भासल्यास जवानांसोबत सीमेवर येथील मुस्लिम समाज उभा राहील.हा हल्ला देशाच्या लोकशाहिवरील हल्ला आहे. आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. सर्व शाहिद जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आम्ही भारतीय लष्कराला पूर्ण समर्थन देत असून आवश्यकता भासल्यास जवानांसोबत सीमेवर येथील मुस्लिम समाज उभा राहील.- हाजी जकेरीया मेमन