पुणे : वाढदिवस साजरा करण्याच्या नव्या नव्या पद्धतीसमोर येत आहे.रस्त्यावर तलवारीने, कोयत्याने यांनी केक कापत धिंगाणा घातल्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात. काहीजणांवर पोलीस गुन्हा देखील दाखल केले जातात. मात्र असे भयानक प्रकार थांबण्याचे काही नाव घेताना दिसत नाही. अशाच प्रकारे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे काही तरुणांनी आपल्या मित्राचा अजब-गजब प्रकारे वाढदिवस साजरा केला. पण हा धिंगाणा 'बर्थ डे बॉय' सह त्याच्या मित्रांना चांगलाच महागात पडला आहे.
पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे सकलेन नासिर शेख याचा नुकताच १८ वा वाढदिवस होता. यावेळी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या मित्रांनी केक कापल्यानंतर जमलेल्या त्याच्या मित्रांनी एकमेकांना अंडी फेकून मारत परिसरात चांगलाच धुडगुस घातला. नारायणगाव पोलिस ठाण्यात बर्थ डे बॉय आणि त्याच्या ६ मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, नारायणगाव येथील मुक्ताई मंदिर परिसरात सकलेन व त्याचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. इथपर्यंत सर्व काही सुरळीत सुरु होते. ;पण त्यानंतर काहीच वेळात सकलेनच्या मित्रांनी त्याला जोरजोऱ्यात अंडी फेकून मारण्यास सुरुवात केली. या धिंगाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. पोलिसांना ज्यावेळी या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी या तरुणांविरुद्ध कारवाईचा बडगा उचलत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे सकलेन आत्तार, साकीर आमीन जमादार, आरमान खालीद शेख, मोईन अकलाक आत्तार, मोसीन फिरोज ईनामदार, जाहिद पिरमहम्मद पटेल. (सर्व रा. मुस्लिम मोहल्ला, नारायणगाव) अशी आहेत. नारायणगाव पोलीस स्टेशनचे दत्तात्रय गुंड यांनी या धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
वाढदिवस साजरा करण्याच्या 'हटके' स्टाईलच्या नावाखाली पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये तलवारी,कोयते यांच्या साह्याने केक कापण्याच्या घटना प्रमाणात घडत आहे. पोलिसांकडून कारवाई केली जात तरी ती अशा घटनांना रोखण्यात कमी पडत आहे. या वाढदिवस साजरा करण्यापाठीमागे परिसरात दहशत निर्माण करण्याचा हेतू असतो.मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड,औरंगाबाद यांसारख्या मोठं मोठ्या शहरापुरते मर्यादित असलेले असे भयानक प्रकार आता गाव व तालुका पातळीवर सुरु झाले आहे. पोलिसांनी लवकर जर अशा प्रवृत्तींना आळा घातला नाहीतर समाज जीवन धोक्यात येणार आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर खाकी वर्दीची जरब बसणे अत्यंत गरजेचे झाले आहे.