श्रीकिशन काळे
पुणे : बाळांना नाव देताना बारसे करण्याचा कार्यक्रम केला जातो. परंतु आता राज्यातील सुमारे ३५० हून अधिक फुलपाखरांचेही ‘बारसे’ होणार आहे. त्यांना अस्सल मराठी नावे देण्यासाठी राज्य जैवविविधता मंडळाने पुढाकार घेतला असून, त्यासाठी समिती स्थापन केली आहे.
राज्य जैवविविधता मंडळाने त्यासाठी खास समिती स्थापन केली आहे. त्याची बैठक नुकतीच झाली. समितीमध्ये फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले, दिवाकर ठोंबरे, डॉ. राजू कसबे व जयंत वडतकर यांचा समावेश आहे. या बैठकीमध्ये फुलपाखरांना मराठी नावे सुचविण्यात आली आहेत. काही नावेदेखील काढली आहेत. फुलपाखरू दिसायला खूप सुंदर असते. त्याच्या पंखांवर विविधरंगांची मुक्त उधळण असते. त्यामुळे त्या रंगावरून किंवा ठिपक्यांवरून त्यांना नावे देता येणार आहेत. महाराष्ट्रात ३५० हून अधिक प्रजाती आहेत. सर्वाधिक प्रजाती पश्चिम घाटात दिसून येत असल्याचे राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर यांनी सांगितले. फुलपाखरांच्या मराठी नावांची यादी तयार केल्यानंतर ती नागरिकांसाठी खुली केली जाणार आहे. त्यात नागरिकांकडूनदेखील नावे मागविणार आहेत.फुलपाखरू खूप सुंदर दिसते आणि राज्यात त्याच्या ३५० च्या वर प्रजाती आहेत. या सर्वांना मराठी नावे देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी चार जणांची समिती स्थापन केली आहे. फुलपाखरांना इंग्रजी नावे आहेत, पण ती लक्षात राहात नाहीत. त्यांना मराठीतील अगदी लक्षात राहणारी सोपी नावे आम्ही शोधणार आहोत. इंग्रजी नावांचे शब्दश: भाषांतर नको आहे, तर अस्सल मराठी नावं हवीत. झाडांना मराठी नावे आहेत, मग या फुलपाखरांना का नको, म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे.- विलास बर्डेकर, अध्यक्ष,महाराष्ट्र जैवविविधता मंडळबटरफ्लायला चिंगी अन् गोल फिरणाऱ्यास पिंगा...बटरफ्लायला चिंगी आणि गोल गोल फिरणारे फुलपाखरू असते त्याला पिंगा अशी सोपी आणि सुंदर नावे हवी आहेत. खूप किचकट नको. आम्ही प्रयत्न तर करीत आहोत. नावांची यादी आम्ही लोकांसाठी जाहीर करणार आहोत. त्यावर लोकांकडून प्रतिक्रिया घेऊन नावे अंतिम केली जाणार आहेत, असे विलास बर्डेकर यांनी सांगितले.