पुण्यात ९ एप्रिलपासून सायंकाळी सहानंतर संचारबंदी सुरू केली होती. लोक जणू तोच आदेश आहे, असे मानत आहेत. त्यामुळे राज्यपातळीवर दिवसाच्या संचारबंदीचे दिलेल्या आदेशाचा विसर पडला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत, रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्या आहेत. त्यामुळे कोणीही संचारबंदीचे पालन करत नाही, असे दिसून येत आहे. भाजी खरेदी, मिठाईची दुकाने, केक शॉप, हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ घेण्यास लोक जात आहेत. काही पालक तर मुलांना दुचाकीवर बसवून खरेदीला घेऊन जात असल्याचेही दिसत होते. काही दुकाने मागील दाराने सुरू आहेत. सोसायट्यांमध्ये तरुण टोळक्याने गप्पा मारत आहेत. पोलीस कुठेही कुणाला अडवत नाहीत... लोकांचे दैनंदिन व्यवहार सुरूच आहेत... लोक गल्ल्यांमध्ये वॉकपण करत आहेत
संचारबंदीचे आदेश फारसे गांभीर्याने घ्यायचे नाहीत, असे पोलिसांनाही सांगितले आहे का? असा प्रश्न पडत आहे. दिवसा अगदीच तुरळक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त दिसत आहे. बाहेर पडणाऱ्या नागरिकांना विचारणा होत नाही.
सायंकाळी सहानंतर मात्र चित्र वेगळे आहे. पोलिसांची गाडी फिरायला सुरू झाल्यावर रस्त्यावरची गर्दी कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. दुकाने, टपऱ्या बंद करण्यासाठी आवाहन केले जाते.
बंदोबस्तावरील पोलिसांना याबाबत विचारल्यावर त्यांनीही आपली हतबलता व्यक्त केली आहे. कोणालाही विचारल्यावर ते कारण सांगतात. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडल्यावर कारवाई करता येत नाही. त्यामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांना हटकून तरी काय उपयोग असे त्यांचे म्हणणे आहे.