रहाटणी : सध्या शहरांमध्ये नव्हे तर देशांमध्ये विविध प्रकारच्या लुटमारीमुळे किंवा फसवेगिरीमुळे तसेच आॅनलाइन फसवेगिरीमुळे शहरातीलच नव्हे तर देशातील नागरिक हैराण आहेत. यावर आळा बसावा म्हणून पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तरीही नागरिक कुठल्याही प्रकारचा बोध घेताना दिसून येत नाही़ सध्या शहरामध्ये हॉटेल, पेट्रोल पंप, मॉल यासह शहरातील मोठमोठ्या दुकानांसमोर गिफ्ट कूपनच्या नावाखाली नागरिकांचे नाव, मोबाइल क्रमांक, ई मेल सर्रास लिहून घेतला जात आहे़ आपणास काही तरी मिळेल या हव्यासापोटी नागरिकही आपला डेटा देत आहेत़ मात्र सध्या सुरू असलेल्या आॅनलाइन फसवेगिरीमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. हे कुठेतरी थांबण्यासाठी पोलीस प्रशासनाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे़
सध्या शहरातील पेट्रोल पंपावर या ना त्या कारणाचे गिफ्ट कूपन घेऊन काही युवक युवती फिरताना दिसून येत आहेत़ पेट्रोल भरण्यासाठी वाहन थांबले की अमुक एका कंपनीची गिफ्ट योजना आहे तुम्ही तुमचे नाव, पत्ता व मोबाइल क्रमांक लिहून द्या, तुम्हाला हमखास एक गिफ्ट लागेल असे सांगण्यात येत आहे़ मात्र आपली वैयक्तिक माहिती अशा व्यक्तींकडून खरंच गोपनीय राहील का हा खरा प्रश्न आहे़ अशी माहिती दिली की, काही दिवसांनी नागरिकांना इन्शुरन्स कंपनी, हेल्थ इन्शुरन्स कंपनी, मधून विविध प्रकारचे क्लासेस, मसाज पार्लर अशा विविध ठिकाणांहून आॅफर्सचे, फोन, ई-मेल, एस़ एम़ एस़ येत आहेत़ त्यामुळे सहाजिकच सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे़ कधी एसएमएस तर कधी फोन त्यामुळे आपली माहिती ह्या लोकांकडे कशी पोहोचली याचे कोडेदेखील नागरिकांना उलगडत नाही़ सध्या आॅनलाइन फसवणूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे़ त्यामुळे असे गिफ्टच्या नावाखाली ई-मेल किंवा मोबाइल नंबर देणे किती फायद्याचे आहे हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे़
शहरातील मॉल, पेट्रोल पंप, शोरूम आदी ठिकाणी गिफ्ट कुपनच्या नावाखाली आपली वैयक्तिक माहिती भरून घेण्यासाठी काही व्यक्तींकडून सक्ती केली जात चित्र दिसून येत आहे़ मात्र हे माहिती देणे काही नागरिकांच्या जिवावरही बेतत आहे. तुम्हाला अमुक एका किमतीचे गिफ्ट लागले असून, ती तुम्ही घेण्यासाठी पत्नीसह या, अशा सूचना देऊन अनेक जोडप्यांना एखाद्या सेमिनारमध्ये बोलावले जाते़ तिथे शेकडो नागरिकांच्या समोर त्यांना एखाद्या बिजनेस फंडा सांगितला जातो. त्यात कशी गुंतवणूक करायची त्यातून किती उत्पन्न मिळेल याची सर्व माहिती सांगितली जाते़ त्याच ठिकाणी त्यांना सभासद करून घेतले जाते. त्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले जातात़ त्यानंतर आपण फसलो गेलो असल्याची जाणीव होते. मात्र हे किती योग्य व अयोग्य हेसुद्धा नागरिकांनी तपासून पाहणे गरजेचे आहे. हे जरी असले तरी गिफ्टच्या नावाखाली एखादा व्यक्ती आपला नाव पत्ता मोबाइल क्रमांक ई-मेल घेत असल्यास ती देणे योग्य की अयोग्य हे स्वत: ठरविणे गरजेचे आहे. सध्या सर्व नागरिकांचे मोबाइल नंबरला आधार क्रमांक लिंक केलेले आहेत़ मोबाइल क्रमांक व आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक केले असल्याने आपल्या बँकेतून आॅनलाइन व्यवहार होऊ शकतो़ त्यामुळे एखाद्या अनोळखी व्यक्तीला गिफ्ट कुपनच्या नावाखाली आपला पत्ता, मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक, ई-मेल देणे योग्य की अयोग्य हे स्वत:च ठरवायचे आहे़ मात्र अशा गोरख धंद्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत़माहिती संकलनासाठी यंत्रणाकाही तरुण-तरुणी दिवसभर जमा केलेली माहिती विशिष्ट एका कंपनीला विकत असल्याचेही बोलले जात आहे. खासगी क्लासेस, हेल्थ इन्शुरन्स, मेडिक्लेम इन्शुरन्स अशा विविध प्रकारच्या कंपन्यांना हे तरुण-तरुणी जमा केलेली माहिती देत आहेत. त्यानुसार समोरील कंपनीच्या व्यक्ती अशा व्यक्तींना फोन करून त्रास देत असल्याचे चित्र सध्या तरी पिंपरी-चिंचवड शहरात दिसून येत आहे. मात्र यावर कुठेतरी अंकुश बसावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. नव्हे तर पेट्रोल पंप, हॉटेल, शोरूम आदी ठिकाणी माहिती भरून घेणाऱ्या व्यक्तींना उभे राहू न देण्याची तसदी संबंधित व्यक्तींनी घेण्याची गरज आहे़ अन्यथा असे प्रकार दिवसेंदिवस घडतच राहणार.