ठाकरे-पवारांच्या ' जम्बो ' घाईने नागरिकांना ताप; आरोग्य यंत्रणांच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 08:31 PM2020-09-02T20:31:39+5:302020-09-03T11:18:42+5:30
नावाला ‘जम्बो’..मनुष्यबळ ‘मिनी’च !पुण्यात ८०० खाटांच्या रुग्णालयातील ४०० खाटांचाच प्रत्यक्ष वापर
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा गाजावाजा करत उभारण्यात आलेल्या ‘जम्बो कोविड सेंटर’ हे केवळ नावालाच ‘जम्बो’असून मनुष्यबळ मात्र अत्यंत कमी आहे. करारनाम्यामध्ये नमूद केल्यापेक्षा अत्यंत कमी प्रमाणात याठिकाणी मनुष्यबळ काम करीत असल्याचे स्पष्ट झाले असून ८०० खाटांच्या या रुग्णालयामध्ये ४०० खाटाच प्रत्यक्षात वापरात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या रुग्णालयाचा कारभार ‘बडा घर पोकळ वासा’ अशा पद्धतीने चालल्याचे चित्र आहे.
‘लोकमत’ने पहिल्या दिवसापासूनच याठिकाणच्या असुविधांवर बातम्यांच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे. याठिकाणची वैद्यकीय सुविधा पुरविणा लाईफलाईन या संस्थेच्या पंचतारांकित हॉटेल्सच्या मागण्यांमुळे हैराण झालेल्या पालिकेच्या अधिका-यांची डोकेदुखी वाढत चालली आहे. याठिकाणी उपचार करण्याची आणि तज्ञ डॉक्टर्स, नर्सेस व अन्य कर्मचारी पुरविण्याची जबाबदारी लाईफलाईन या संस्थेची आहे. परंतू, याठिकाणी पीएमआरडीएसोबत झालेल्या करारापैकी अवघ्या ५० टक्केच कर्मचारी काम करीत असल्याचेही पालिकेच्या अधिका-यांनी सांगितले.
जम्बो रुग्णालयामध्ये एकूण ८०० खाटा आहेत. त्यापैकी केवळ ४०० खाटाच वापरात आल्या आहेत. उर्वरीत ४०० खाटा मनुष्यबळाअभावी वापरात येत नसल्याचे खुद्द पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. ‘लाईफलाईन’ला पालिकेने मनुष्यबळ वाढविण्याबाबत पत्र दिले होते. परंतू, त्यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केले. आता पुन्हा पालिकेने त्यांना मनुष्यबळ वाढविण्याबाबत पत्र दिले आहे.
..........
जम्बो रुग्णालयात आजमितीस ३५८ रुग्ण दाखल आहेत. यामध्ये ३१८ रुग्ण आॅक्सिजनवर, ४० रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. यातील ३० जणांची प्रकृती गंभीर आहे.
====
जम्बो रुग्णालयातील वापरात असलेल्या खाटांची माहिती
ऑक्सिजन ३४०
एचडीयू ३०
व्हेंटिलेटर्स ३०
====
पीएमआरडीएकडून संबंधित संस्थेसोबत करार करण्यात आलेला आहे. पालिकेने घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तात्काळ बैठक घेऊन त्रूटी दूर करण्याच्या सूचना केल्या असून तसे पत्र पीएमआरडीएला दिले जाणार आहे. ससूनमधील रुग्ण जम्बोमध्ये पाठविण्यात आले आहेत. यासोबतच ग्रामीण भागामधूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण येत आहेत. अत्यवस्थ रुग्णांमध्ये 28 टक्के रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. याठिकाणी मनुष्यबळाची कमतरता आहे. मनुष्यबळ वाढविण्याबाबत यापुर्वीच लाईफलाईनला पत्र दिले होते. आज पुन्हा पत्र दिले आहे. व्यवस्था सुरळीत करण्यावर यंत्रणा भर देत आहेत.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महानगरपालिका