पुणे : आपले आयुष्य किती आहे हे कोणालाच माहिती नसते. पुढच्या क्षणी काय घडेल, हे देखील कोणाला माहिती नाही, म्हणून आज माणसे एकमेकांना सोबत घेऊन जगत आहेत. कोणालाही पुढील क्षण माहिती नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो क्षण आत्ता आहे, त्याक्षणी तुम्ही देवाचे नामस्मरण करा. नामस्मरण हेच परमेश्वराच्या जवळ जाण्याचे प्रवेशद्वार आहे, असे मत ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांनी व्यक्त केले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चातुमार्सानिमित्त कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रवचन गणेश कला क्रीडा मंच येथे गुरूवार, दिनांक ३० आॅगस्ट पर्यंत सुरू आहे. यावेळी त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे निरुपण करताना नामस्मरण आणि देव याचे विश्लेषण केले. बाबामहाराज सातारकर म्हणाले, ज्याक्षणी आपण देवाचे नामस्मरण करतो, त्याक्षणी आपल्या मनात इतर कोणतेही विचार येऊ नयेत. सद्गुरू कृपेचा एक क्षण तुमचे जीवन पालटू शकतो. परंतु तो क्षण तुमच्या जीवनात असाच येत नाही, त्याकरीता देवाची तशा प्रकारची उपासना देखील करावी लागते.ते म्हणाले, ज्ञानाने मुक्ती साध्य होते, परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाच्या द्वारी उभे राहिलात, देवाचे नामस्मरण केले तर चारही मुक्ती साध्य होतील. वेदांच्या मागार्ने गेल्यानंतर आपण मुक्तीकडे जातो. परंतु वारकरी सांप्रदायाच्या मागार्ने गेलात, तर तुम्ही भक्तीच्या मार्गाकडे जाता. जन्म असेल तर भक्ती घडेल. पंढरीची वारी केली तर तुम्हाला चारही मुक्ती साध्य होतील, असेही त्यांनी सांगितले.
नामस्मरण हेच परमेश्वराचे प्रवेशव्दार - ह.भ.प. बाबामहाराज सातारकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 1:47 AM