पुणे : भगिनी निवेदिता या परदेशी व्यक्ती असूनही भारतीय मूल्यांचा सूक्ष्मपणे अभ्यास करीत मूल्यधिष्ठित विचारसरणीशी एकरूप झाल्या; मात्र आपल्याला अजूनही ‘भारतीयत्व’ समजलेले नाही. गाय घरात आणली तर कुटुंबातील सदस्य या नात्याने तिचे स्वागत करून पूजन केले जाते. ती पूजनीय आहेच; मात्र सध्या गोमातेचे रक्षण करण्याच्या नावाखाली धांगडधिंगा सुरू आहे, अशा खरमरीत टीकेतून लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी अप्रत्यक्षपणे गोरक्षकांवर निशाणा साधला.विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभागाच्या वतीने आयोजित ‘चिंतन भगिनी निवेदितांचे’ या पुस्तक संचाच्या प्रकाशनाप्रसंगी त्या बोलत होत्या.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मुक्ता टिळक, लेखिका सुरुचि पांडे, मृणालिनी चितळे, अदिती जोगळेकर-हर्डीकर तसेच केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिता भिडे, सुधीर जोगळेकर आणि प्रकाश पाठक उपस्थित होते.भगिनी निवेदिता यांनी आत्मसात केलेल्या भारतीय मूल्यव्यवस्थेशी गुरू-शिष्य परंपरा, कला-संस्कृती आणि शिक्षण या मुद्द्यांची यथायोग्य सांगड घालून महाजन यांनी उत्तम विवेचन केले.त्या म्हणाल्या, ‘‘स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांच्यातील गुरुशिष्य परंपरेचा धागा पकडून गुरू-शिष्य नाते कसे असले पाहिजे, याचे आदर्श उदाहरण म्हणून स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांच्याकडे पाहावे. विवेकानंदांनी त्यांना शिष्य म्हणून तोलूनमापून तयार केले. गुरूकडून आपल्याला काय हवे, कोणते ज्ञान आणि चिंतन अपेक्षित आहे, याची तयारी करूनच शिष्याने गुरूकडे जायला पाहिजे. गुरूनेही शिष्याला परखले पाहिजे. मात्र, आजकाल या नात्यात खूप काही चालले आहे. गुरूची एक आचारसंहिता आणि अनुशासन असायला हवे. ऊठसूट गुरूची पदवी लावून घेता काम नये, असे सांगत त्यांनी तथाकथित गुरूंवर टीकास्त्र सोडले.लेखिकेसह निवेदिता भिडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुधीर जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले. अरुण करमरकर यांनी सूत्रसंचालन केले.युवा पिढीला मूल्याधिष्ठित शिक्षण द्यावेस्वामी विवेकानंद यांनी समाजहितासाठी जो मार्ग अवलंबला त्यावरच भगिनी निवेदिता यांनी मार्गक्रमण केले. राष्ट्रप्रेम हे सर्वोच्च आहे. जेव्हा राष्ट्रप्रेमाची भावना मनात जागृत होईल, तेव्हा विश्वाच्या निर्मितीसाठी चांगले काम होऊ शकेल. युवा पिढीला मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याची गरज आहे. यातूनच एक चांगला माणूस आणि नागरिक निर्माण होईल, असे मुक्ता टिळक म्हणाल्या.मातृभाषेतून शिक्षण देणे महत्त्वाचेभारतीय मूल्यव्यवस्था ही आदर्शवत आहे, त्यामधून संस्काराची बीज रूजली गेली आहेत. गाय ही आपली माता असून, पूजनीय आहेच. तिला विकत घेऊन घरात आणल्यानंतर तिची पूजा केली जाते; मात्र गोरक्षणाच्या नावाने धांगडधिंगा सुरू असल्याचे सुमित्रा महाजन म्हणाल्या.शिक्षणाच्या संस्कारातून व्यक्तिमत्त्व घडत असते. आईचे दूध जसे बाळासाठी पोषक असते, त्याचप्रमाणे मातृभाषेतून शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. मातृभाषेतून शिक्षण घेणत्र्यांची संख्या किती आहे, त्यावर देशाचे भवितव्य अवलंबून असते, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले.
गोमातेचे रक्षण करण्याच्या नावाखाली धांगडधिंगा, सुमित्रा महाजन यांचा अप्रत्यक्षपणे गोरक्षकांवर निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 2:23 AM