अंकुश जगताप, पिंपरी विकासकामांत अडथळा ठरविल्या गेलेल्या अनेक वृक्षांच्या पुनर्लागवडीसाठी उद्यान विभागाने उन्हाळ्याचा मुहूर्त गाठला आहे. परिणामी, अशा वृक्षांचा उन्हाच्या झळांमध्ये होरपळून बळी गेल्याचा प्रकार पिंपरी - चिंचवड शहरात झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहरामध्ये वृक्षलागवड मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली गेली. त्यामुळे बहुतांश प्रमाणात यशही आले आहे. त्यातून अनेक भागांतील रस्त्यांलगत सावली व नवनरम्य वातावरण तयार झाले आहे. मात्र, यानंतर महापालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या विकासकामांसाठी मोठ्या मेहनतीने जगविलेले हे वृक्षच अडथळा ठरत असल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाला आहे. सध्या बीआरटीसाठी अशा बळी द्याव्या लागणाऱ्या वृक्षांची संख्या अधिक आहे. त्या कामी एकामागून एक हजारो वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्याचा घाट घातला जात आहे. हे काम पावसाळ्यात आणि हिवाळ्यात केले, तर त्याला यशही मिळाले आहे, यात दुमत नाही. मात्र, सध्या सुरू असलेले पुनर्रोपण चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी नागरिक करीत आहेत. वास्तविक सध्या जी विकासकामे सुरू आहेत, तेथे अडथळा ठरणारे वृक्ष पावसाळ्यातच काढून त्यांचे पुनर्रोपण करणे शक्य झाले असते. मात्र, स्थापत्य आणि उद्यान विभागातील ताळमेळाचा अभाव असल्याने ऐन उन्हाळ्यात हे काम करण्याची वेळ उद्यान विभागावर आली आहे.
नाव पुनर्रोपणाचे; काम वृक्षबळीचे !
By admin | Published: May 03, 2015 5:58 AM