पुणे : पुणे रेल्वेस्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, तसेच शनिवारवाड्याचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विशेष प्रयत्न करायला हवेत, अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे. शनिवारवाड्याच्या २९३ व्या वर्धापनदिनानिमित्त खासदार मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार हेमंत रासने यांच्याकडे बुधवारी ही मागणी केली. त्यावर केंद्र सरकारपर्यंत ही मागणी घेऊन जाण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवारवाड्यावर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे सरचिटणीस कुंदनकुमार साठे यांनी सर्वांचे स्वागत करून ही मागणी जाहीरपणे मांडली. पुणे शहराची ओळख शनिवारवाड्याच्या महापराक्रमी बाजीराव पेशव्यांच्या इतिहासाची आहे. पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे नाव देण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजीराव पेशव्यांच्या इतिहासाचे स्मरण व्हावे आणि सर्वांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने पुणे रेल्वेस्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देणे उचित होईल, अशी मागणी पेशवे प्रतिष्ठानचे कुंदनकुमार साठे, अनिल गानू, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर यांच्याबरोबरीने देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित, रमेश भागवत, सकल ब्राह्मण समाजाचे समन्वयक भालचंद्र कुलकर्णी, सचिन बोधनी, पुणे सार्वजनिक सभेचे नारगोळकर, भारत इतिहास संशोधक मंडळाचे पांडुरंग बलकवडे, सावरकर जयंती महोत्सवाचे प्रमुख सूर्यकांत पाठक, तसेच पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा आदींनी केली.
मंत्री पाटील म्हणाले की, शनिवारवाड्याचे गतवैभव पुन्हा नागरिकांना दिसले पाहिजे, यादृष्टीने एक चांगला प्रकल्प अहवाल तयार करावा आणि त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करणार आहे.
खासदार कुलकर्णी म्हणाल्या की, पुण्याचा इतिहास सर्व जगाला समजला पाहिजे, पुण्याची ओळख शनिवारवाडा आहे, त्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करुन शनिवारवाड्याचे गतवैभव पुन्हा मिळवून दिले पाहिजे. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांना निवेदन देऊन पुणे रेल्वेस्थानकाला बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.