- बापू बैलकर, पुणेजिल्ह्यात ६४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. १४४ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. येथे स्थापन करण्यात आलेला टंचाई कक्ष हा नावापुरताच आहे. फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यात टंचाईची तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषदेने तातडीची बैठक घेऊन अध्यक्ष प्रदीप कंद यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. यात जिल्हा परिषदेत स्वतंत्र टंचाई कक्ष तत्काळ स्थापन करण्यात यावा व दररोजचा अहवाल सायंकाळी ४ वाजेपर्यंत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार १६ फेबु्रवारी रोजी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आदेश काढून १४ जणाच्या टीमवर जबाबदरी निश्चित करून दिली.या टीमचे प्रमुख म्हणून उपकार्यकारी अभियंता चाटे यांच्यावर जबाबदारी दिली. त्यांनी आदेशात नमूद करून दिलेल्या सर्व कामकाजावर समन्वय ठेवायचा आहे. तसेच नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्याशी संबंधित माहिती सायंकाळी ४ वाजेपर्यंत सादर करावी. ही संकलित माहिती प्रमुखाने जिल्हाधिकारीस्तरावर सादर करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या टंचाई कक्षाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना टंचाई कक्ष शोधूनही सापडत नव्हता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या दालनात माहिती घेतली असता, टंचाई कक्ष आहे का नाही, हे तेथील कर्मचाऱ्यांनही माहीत नव्हते. टंचाईकाळात पाणीपुरवठा विभाग काम पाहतो म्हणून पाणीपुरवठा विभागात माहिती घेतली असता, तेथे टंचाई कक्षाचा कुठलाही फलक लावलेला दिसला नाही. कार्यकारी अभियंते कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. मग उपकार्यकारी अभियंता चाटे यांच्याकडे टंचाई कक्षाची माहिती विचारली असता त्यांनी होय टंचाई कक्ष स्थापन केला असून, मीच त्याचा प्रमुख आहे, असे सांगितले. त्यांना टंचाईची माहिती विचारली असता बैैठकीला जायाचेय, भाऊसाहेबांकडून माहिती घ्या, असे सांगितले. संबंधित भाऊसाहेबांकडे गेलो असता, मी अध्यक्ष साहेब किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय माहिती देऊ शकत नाही, असे सांगितले. मात्र, त्याच दरम्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाईसंदर्भातच बोलत होते. त्यांचे बोलणे झाल्यानंतर त्यांनी टंचाई आराखड्याच्या अंमलबजावणीची माहिती त्यांना हवी होती ती देत होतो, असे सांगितले. त्यांना ही माहिती दररोज एकत्र संकलित केली जात नाही का? असे विचारले असता, मी आताच संबंधितांना फोन करून कशीबशी ही माहिती घेतल्याचे सांगितले. बुधवारी पुन्हा चाटे यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, विंधन विहिरी भुसे यांच्याकडे मिळेल, प्रादेशिक पाणीपुरवठा बुरसे यांच्याकडे मिळेल, टँकरची माहिती त्यांच्याकडे मिळेल...असे सांगितले. संकलित माहिती मिळालीच नाही. मुळात टंचाई कक्ष स्थापन करून प्रमुखाने दररोज दिलेल्या कामांची माहिती संकलित करून ती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देणे अपेक्षित आहे किंवा आदेशात तसे नमूद केले आहे, मात्र याचे गांभीर्य तेथे दिसले नाही. टंचाईबाबत तक्रार कुठे करायची? जिल्हा परिषदेत १३ तालुक्यांतून दररोज कामासाठी ग्रामस्थ येत असतात. त्यांना त्यांच्या गावातील टंचाईबाबत काही तक्रार करायची असेल किंवा माहिती द्यायची असेल, तर त्यांनी कुठे द्यायची? कारण प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर कुठेही टंचाई कक्ष या मजल्यावर आहे, यांच्याशी संपर्क साधा, असा फलक नाही. तसेच, पाणीपुरवठा विभागातही असा फलक लावलेला नाही.
जिल्हा परिषदेतील टंचाई कक्ष नावापुरता
By admin | Published: March 17, 2016 3:02 AM