पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघात ६९ हजार १९८ मतदार रहिवासाच्या ठिकाणी आढळले नसल्याने त्यांची नावे यादीतून वगळली जाणार आहेत. ४ डिसेंबरपर्यंत हरकती-सूचना दाखल करण्याचे आवाहन अधिकारी यशवंत माने यांनी केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये मतदारयाद्यांमधील मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मयत, दुबार, स्थलांतरित व मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची पाहणी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. ६९ हजार १९८ मतदार नोंदणीकृत ठिकाणी राहत नसल्याचे स्पष्ट झाले. मतदारांना नोटीस बजाविल्यानंतर तीन हजार २६५ मतदारांनी त्यांचे फोटो निवडणूक विभागाकडे जमा केले, तर बारा हजार ९४६ मतदारांनी त्यांची नावे पिंपरी मतदारसंघात कायम ठेवावीत, असे लेखी जबाब नोंदविले आहेत. दरम्यान, ६९ हजार १९८ मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. मात्र, ही नावे वगळण्यापूर्वी संबंधित मतदारांना हरकती व सूचना दाखल करण्याची संधी देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
पिंपरीत ६९ हजार मतदारांची नावे वगळणार
By admin | Published: November 20, 2015 3:21 AM