राजगुरुनगर : राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता करवसुली मोहीम सुरू झाली असून, शासनाच्या आदेशानुसार मोठ्या थकबाकीदारांची नावे शहरातील मुख्य चौकांमध्ये फलकांवर लावण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी सचिन सहस्रबुद्धे यांनी दिली. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या माहिन्यामध्ये नगर परिषदेची करवसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार असमाधानकारक वसुली असणाऱ्या नगर परिषदांना निधी देताना विचार केला जाणार आहे. त्यामुळे राजगुरुनगर परिषदेकडूनही करवसुलीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नोटाबंदीच्या काळात जुन्या नोटांच्या स्वरूपात करभरणा करण्यास परवानगी दिल्यामुळे काही प्रमाणात मालमत्ता कर वसूल झाला होता. आतापर्यंत नगर परिषदेची ६५ टक्के करवसुली झाली आहे. उर्वरित करवसुलीसाठी २० फेब्रुवारीपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. संपूर्ण शहरात ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. कर्मचारी घरोघरी जाऊन करवसुली करीत आहेत. तरीही, अनेक वर्षांपासूनचे काही मोठे थकबाकीदार असून त्यांची संख्या सुमारे दीडशेच्या घरात आहे. अशा थकबाकीदारांना प्रथम मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या सहीने नोटीस पाठवली जाणार आहे. तरीही त्यांनी थकबाकी न भरल्यास शासनाच्या आदेशानुसार त्यांची नावे शहराच्या मुख्य चौकात फलकांवर लावण्यात येणार आहेत. ज्या सोसायट्यांमधील फ्लॅटधारकांकडून करभरणा झाला नसेल, अशा सोसायट्यांची नळजोडणी तोडण्यात येणार आहे. तर, वैयक्तिकरीत्या काही थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्यात येईल. वसुली बँड शहरातून फिरवला जाणार असून त्यामध्ये सर्व पदाधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. (वार्ताहर)
बड्या थकबाकीदारांची नावे झळकणार मुख्य चौकांमध्ये
By admin | Published: March 05, 2017 4:09 AM