पुणे : पुण्यातील रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. टिळक रोडवर मोर्चा निघणार असल्याचे कळताच याचा धसका घेत महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवले. पुण्यात भाजपचे खासदार, आमदार असताना तसेच महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असताना शहरात सगळीकडे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या खड्ड्यांना भाजप नेत्यांची नावे देत शिवसेनेने हे अनोखे आंदोलन केले आहे.
शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, विजय देशमुख, नगरसेविका पल्लवी जावळे, विशाल धनवडे, अशोक हरनावळ आणि शिवसैनिक उपस्थित होते.
संजय मोरे म्हणाले की, ''शहराचा विकास केल्याची फ्लेक्सबाजी करून मिरविणाऱ्या आणि 'स्मार्ट सिटी'ची स्वप्ने दाखविणा-या सत्ताधारी भाजपची लाज पुण्यात पडलेल्या खड्ड्यांनी काढली. अनेक रस्त्यांवर खड्डे कायम असून, काही ठिकाणी अत्यंत वाईट पद्धतीने पॅच वर्क करण्यात आले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर खडी उखडून आली असून, त्यावरून गाडी घसरून पडण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. पुण्याला स्मार्ट बनविण्याची स्वप्ने दाखविणारे कारभारी साधे रस्ते नीट तयार करू शकत नाहीत, ही शोकांतिका आहे. ठेकेदार हे महापालिकेचे जावई असल्याच्या थाटात वावरत आहेत. त्यांच्यावर सत्ताधारी कोणताही वचक निर्माण करू शकले नाहीत. ठेकेदार सत्ताधाऱ्यांना विचारत नाहीत. किंमत देत नाहीत. मनमानी कारभार करतात. त्याचाच फटका पुणेकरांना बसतो.''
रस्त्याची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई काहीच नाही
''पाच वर्षे संपत आली, तरी भाजपाला पुणेकरांना साध्या सुविधा देखील देता आलेल्या नाहीत. ठेकेदारांना वाचविण्यासाठी आता रस्त्यांची कामे करण्यासाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार आहेत. याचा अर्थ असा की, रस्ते करताना केलेला खर्च वाया, रस्त्याची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई काहीच नाही आणि रस्ते दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी होणार. प्रत्येक वेळी स्वतःचे खिसे भरण्याचे विक्रम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना 'न खाऊंगा ना खाने दूंगा.' या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेचा विसर पडलेला दिसतो आहे असे कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.''