- नितीन चौधरी
पुणे : राज्यात गेल्या वर्षभरात तब्बल ३४ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली असून यात मृत, पत्त्यावर हजर नसलेले तसेच दुबार नावे असलेल्या मतदारांचे प्रमाण जास्त आहे. तर याच काळात २४ लाख नव्या मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे गुरुवारी (ता. ५) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. एकापेक्षा अधिक मतदारसंघांत नावे असलेल्यांची नावे आता वगळण्यावर भर देण्यात येणार असून राज्यात असे २९ लाख मतदार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे मतदार यादीचे पुनरीक्षण करण्याची मोहीम नुकतीच राबविण्यात आली. त्यानुसार जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या काळात राज्यात ८ कोटी ९८ लाख ४२ हजार ३०१ मतदारांची नोंदणी होती. तर दुबार, मृत, स्थलांतरित अशा २९ लाख ७९ हजार ६१ मतदारांची नावे वगळली. तर १४ लाख ७८ हजार ९३४ मतदारांची नावे नव्याने समाविष्ट केली. त्यामुळे ५ जानेवारी २०२२ ला प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीतील सुमारे १५ लाख नावे कमी झाली. ही मतदारयादी ९ नोव्हेंबर २०२२ ला प्रसिद्ध केली. त्यानंतर ८ डिसेंबरपर्यंतच्या एका महिन्याच्या काळात राबविलेल्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ९ लाख २३ हजार ३२ मतदारांची भर पडली. तर ४ लाख ७९ हजार ५३२ मतदारांची नावे वगळण्यात आली. याचाच अर्थ ९ नोव्हेंबरच्या प्रारूप यादीत ४ लाख ४३ हजार ५०० मतदारांची एकूण भर पडली. त्यानुसार राज्यात ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ मतदार आहेत. सध्या ४० हजार अर्ज आलेले असून बुधवारपर्यंत (ता. ४) या अर्जांची छाननी करून त्यांची नावे अंतिम यादीत समाविष्ट करण्यात येतील असेही देशपांडे यांनी सांगितले.
३० डिसेंबर २०२२ पर्यंत तयार करण्यात आलेल्या मतदार यादीची तुलना ५ जानेवारी २०२२ च्या अंतिम मतदार यादीशी केल्यास राज्यात एकूण मतदारांची संख्या १० लाख ५६ हजार ६२७ ने कमी झाली आहे. दुबार मतदारांची नावे वगळण्याचा हा परिणाम असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. तर राज्यात एकापेक्षा जास्त मतदारसंघात नावे असलेल्यांची संख्या तब्बल २९ लाख इतकी असून ही नावे वगळण्यासाठी मोहीम राबविली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही मूळ मतदारांची संख्या आणखी कमी होईल, तसेच मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.
३० डिसेंबरपर्यंतच्या मतदार नोंदणीनुसार टक्केवारी
वयोगट टक्के
१८ ते १९ ०.५३
२० ते २९ १२.८४
३० ते ३९ १६.२३
४० ते ४९ १५.७२,
५० ते ५९ ११.७५
६० ते ६९ ७.६२,
७० ते ७९
४.२५ तर
८० वर्षांहून अधिक २.५१
आकड्यांचा खेळ
विशेष पुनरीक्षण मोहिमेनंतर (९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या काळात)
पुरुष मतदार : ४ कोटी ७१ लाख ३५ हजार ९९९
महिला मतदार : ४ कोटी ३१ लाख ४५ हजार ०६७
तृतीयपंथी मतदार : ४ हजार ७३५
दिव्यांग मतदार ६ लाख ७७ हजार ४८३
नाव, फोटो, पत्त्यात बदल केलेेले मतदार : २ लाख ५८ हजार ६३१
दोन वर्षांपूर्वी राज्यात २३ लाख मतदारांच्या ओळखपत्रात फोटो नव्हते. त्यानंतर अशा मतदारांचे फोटो टाकण्याची मोहीम राबविण्यात आली. आता राज्यात केवळ २ हजार १७४ नावे फोटोविना राहिली आहेत. येत्या काही दिवसांत या मतदारांचे फोटो समाविष्ट करण्यात येणार आहेत.
- श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र