पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी प्रतिरोधित करण्यात आलेल्या उमेदवारांची काळी यादी आयाेगाने जाहीर केली. त्यामध्ये २०११ ते जुलै २०२२ या ११ वर्षांच्या कालावधीतील विविध परीक्षेला बसलेल्या ८३ उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत.
एमपीएससीने जाहीर केलेल्या यादीतील ७९ उमेदवारांना कायमस्वरुपी प्रतिरोधित करण्यात आले असून यापुढे आयोगाकडून घेण्यात येणारी काेणतीही परीक्षा देता येणार नाही. तसेच चौघांना पाच वर्षांसाठी प्रतिरोधित करण्यात आले आहे. त्यांना हा कालावधी संपल्यानंतर पुन्हा परीक्षा देता येतील. परीक्षा कालावधीत गैरप्रकार करणे, सदाेष कागदपत्रे सादर करणे यांसह विविध कारणांसाठी आयोगाकडून उमेदवारांना काळ्या यादीत टाकण्यात येते तसेच त्यांना परीक्षा देण्यासाठी प्रतिबंधित करण्यात येते.
काळ्या यादीतील सर्वाधिक २० उमेदवार हे २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या कर सहायक परीक्षेतील आहेत. यांसह पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, लिपिक, टंकलेखक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, राज्य कर निरीक्षक, आदी परीक्षांमधील उमेदवारांचाही समावेश आहे.