पुणे : मी विद्यार्थी दशेमध्ये जे. जे. आर्ट स्कूलमध्ये असताना रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगवायचो. त्याचे आम्हाला जे पैसे मिळायचे त्यातून स्कूलची फीस भरायचो. मी विद्यार्थी असताना खूप वात्रटपणा करायचो, वाह्यातपणा करायचो. मी मुळात मवाली, गुंड प्रवृत्तीचा. त्याचा मला ‘वेलकम’ चित्रपटात फायदा झाला. चित्रकला शिकताना मी चित्रपटाकडे वळलो आणि त्या माध्यमात काम करायला लागलो, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केल्या.
ज्येष्ठ चित्रकार मारुती पाटील यांचे जीवनचरित्र ‘रंग रेषांचे सोबती-मारुती पाटील’ या पुस्तकाचे प्रकाशन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात पाटेकर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले. यावेळी मारुती पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रेय पाडेकर उपस्थित होते.
पाटेकर म्हणाले, मी चित्रकलेचा विद्यार्थी होतो, पण मी त्यात पुढे काही करू शकलो नाही. मी चित्रकला शिकताना चित्राकडून चित्रपटाकडे वळलो. मी एका नाटकात काम केले होते, तेव्हा कळलं की मला अभिनय येतो. म्हणून मग हीच वाट निवडली. हे माध्यम निवडल्यानंतर खूप अडचणी आल्या. खरंतर आयुष्यात अडचणी आल्याच पाहिजेत, त्यातून अनुभव मिळतो आणि आपण अधिक समृद्ध होतो. मारुती पाटील यांचा अपघात झाला, तेव्हा त्यांनी एक पाय गमावला. पण ते खचले नाहीत. त्यांनी त्यासह जगण्याची जिद्द अंगी बाणावली. आजच्या मुलांना मात्र सहज सोपे आयुष्य मिळालेले असते. ते तितके यशस्वी होतीलच हे सांगता येणार नाही. बरखा पाटीलने प्रास्ताविक केले, तेजस पाटील यांनी आभार मानले.
पत्नीने खूप साथ दिली
मारुती पाटील यांची मुलाखत त्यांचा माजी विद्यार्थी योगेश देशपांडे यांनी घेतली. पुस्तकाची संकल्पना कशी सुचली या प्रश्नावर पाटील म्हणाले,‘‘मला लहानपणापासून निसर्गासोबत जगायला मिळाले. ते माझ्या चित्राचे भाग झाले. माझे जीवनचरित्र साकारण्यासाठी माझी पत्नी नीला हिने आग्रह केला. ती माझ्या पाठीशी राहिली. त्यानंतर माझी मुलगी बरखाने प्रोत्साहन दिले आणि लिहायला लावले.’’
नटसम्राटापेक्षा शेतकऱ्यांची दु:खे मोठी
आज जर कोणी मला नटसम्राट करशील का? असे विचारले, तर मी ते नव्या पद्धतीने करेन. कारण सुख-दु:खाची व्याख्या आज बदलली आहे. नटसम्राटची दु:खे त्या चार भिंतीमध्येच होती, पण आज शेतकऱ्यांची दु:खे पाहिल्यानंतर असं वाटतं, हे किती मोठे आहे? अख्खा संसार ते आभाळाखाली उघडा ठेवतात आणि झोपतात. आपण मात्र, सर्व कडीकुलुपात ठेवतो. शेतकऱ्याकडून भाजी घेताना आपण किंमत ठरवतो, पण मॉलमध्ये गेल्यावर किंमत कमी करतो का हो! नाही ना! कारण ती छापील असते आणि भाजीपाल्यावर छापील नसते, अशी व्यथा नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.
सुख-दु:खांची व्याख्या दररोज बदलली पाहिजे. तेव्हा चित्रकलेचे विषय बदलतील आणि तुम्ही नवे काही तरी निर्माण करतात. मला मी सतत बदलत राहणं आवश्यक आहे. माझ्या चेहऱ्यासह आणि स्वभावासह ५० वर्षे इथे टिकवून आहे, ते महत्त्वाचे आहे. मी कोणाशीही कधी मिळते-जुळते घेणे जमले नाही. त्यामुळे खूप चित्रपट माझ्या हातून गेले असतील, पण मला माझ्यासारखे जगता आले, त्याचे समाधान आहे.
- नाना पाटेकर