पुणे : 'लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार'... या गदिमांच्या गीताच्या ओळी गुणगुणत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘हे गदिमांनी कधी लिहून ठेवलं आहे...अशी मिश्किल टिप्पणी केली; पण पुणेकरांना त्यांचा हा मिश्कील भाव काहीशा विलंबाने कळला आणि काही क्षणांतच सभागृहामध्ये हशा पिकला. खरंतर प्रत्येक मराठी माणसाला गदिमा पुरस्कार मिळालाच आहे. कविता, कथा आणि गाण्यांच्या रूपात तो मिळाल्याने मीही पुरस्कृत झालो. आता त्यांच्या नावाचा पुरस्कार हा मूर्त स्वरूपात मिळालाय इतकंच, असे भावोद्गार त्यांनी काढले.
गदिमा प्रतिष्ठानतर्फे महान कवी-गीतकार ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनी नाना पाटेकर यांना राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते गदिमा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांना विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी सखी सचिव पुरस्कार, संगीतकार कौशल इनामदार यांना चैत्रबन पुरस्कार; तर युवा गायिका रश्मी मोघे यांना विद्याप्रज्ञा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एखादा पुरस्कार मिळाल्यानंतर आपण त्यासाठी लायक आहोत की, नाही याची कारणमीमांसा आपण करायची नाही. पुरस्कार मिळाला म्हणजे आपण लायक आहोत असे समजायचे, असे सांगून भाषण सुरू होण्यापूर्वीच नानांनी षट्कार ठोकला. माझा पिंड शब्द लक्षात ठेवणारा नाही; पण आई काही गुणगुणायची तेव्हा समजले की गदिमा किती मोठे कवी आहेत. ‘लपविलास तू हिरवा चाफा’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’, ’एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात’, ’जाळीमंदी पिकली करवंद’, ’विठ्ठला तू वेडा कुंभार’ अशी सर्व रसांना स्पर्श करणारी गीते लिहिणारे गदिमा लोकविलक्षणच होते. मराठीत क्लिष्ट लिहिणाऱ्या लोकांचा गौरव काहींनी केला; पण गदिमांचे कौतुक सर्व स्तरांतील लोकांनी केले, असे नानांनी आवर्जून सांगितले. हा पुरस्कार मिळाल्याने मला खूप भरून आले आहे. इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा ही माहेरची मिळालेली थाप खूप मोलाची आहे, अशी भावना निवेदिता सराफ यांनी व्यक्त केली.
गदिमांचे चांगले चरित्र पुस्तक आतापर्यंत का निर्माण झाले नाही, याकडे डॉ. सदानंद मोरे यांनी लक्ष वेधले. तुम्ही कोणीही असा; पण तुम्हाला गदिमा आवडत असणारंच. स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई, लाहोर आणि कोलकाता अशी चित्रपट केंद्रे होती. फाळणीनंतर लाहोरचे लोक मुंबईत आले. भारदस्त पंजाबी लोकांमुळे मुंबईतील मराठी माणसाच्या चित्रपट क्षेत्रातील अस्तित्वाला धक्का बसला. त्यानंतरच्या काळात मराठी कलाकारांनी देशपातळीवर छाप उमटवली, अशामध्ये नानांचे स्थान वरचे आहे. ते स्वबळावर घडलेले अभिनेते आहेत असे नानांविषयी गौरवोद्गारही मोरे यांनी काढले.
रश्मी मोघे आणि सहका-यांनी गदिमा गीते सादर केली. दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात शंभर गुण प्राप्त करणाऱ्या १३ विद्यार्थ्यांना गदिमा पारितोषिक देण्यात आले. अमृतमहोत्सवानिमित्त प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे आणि निवेदक अरुण नूलकर यांचा सत्कार केला. कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी प्रास्ताविक केले. राम कोल्हटकर यांनी आभार मानले.