पुणे:काँग्रेसने इंग्रजांना या देशातून घालवले. आताचे भारतीय जनता पार्टीचे सरकार त्यापेक्षा भयंकर आहे, आता त्यांना घालवण्यासाठी काम करूयात, वाद विसरा व पुढे चालायचे शिका अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उमेद भरली.
प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून कामकाजाची थोडक्यात माहिती घेतल्यानंतर पटोले म्हणाले, काँग्रेस लढणारी संघटना आहे. देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचा मोठा वाटा आहे. ती चौकट मोडण्याचा प्रयत्न करणारे सरकार देशात आहे. त्यांना आपल्याला सत्तेच्या सर्व ठिकाणांहून घालवून द्यायचे आहे, त्यासाठी काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपापसातले वाद सोडून द्या, काय काय झाले याची चर्चा करत बसू नका, उद्या काय करायचे आहे याकडे लक्ष द्या. एकत्र आलो तर काहीही अशक्य नाही हे कायम लक्षात ठेवा. एच. के. पाटील यांनीही काहीजणांना प्रश्न विचारले माहिती घेतली.
पक्षाचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या समवेत मंगळवारी दुपारी काँग्रेस (congress) भवनमध्ये पटोले यांनी पुणे, पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवड या तिन्ही ठिकाणच्या प्रमुख पदाधिकारी व आघाड्यांची बैठक घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, आजीमाजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.