पुणे : काँग्रेसमध्ये जसे केंद्रात एक पप्पू आहेत तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत. त्यामुळे ते काहीही विधाने करतात, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तर, संजय राऊत यांना सहकारामधील काय कळतं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पाटील यांनी समाविष्ट गावांमधील ग्रामस्थांशी त्यांच्या अडचणी, समस्या यांबाबत चर्चा केली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नाना पटोले यांनी शुक्रवारी भाजपवर टीका केली होती. त्याचा समाचार पाटील यांनी घेतला. खासदार संजय राऊत यांनी देखील केंद्राकडे सहकार विभाग गेल्याने लोकशाहीला धोका निर्माण झाल्याची टीका केली होती.
पाटील यांनी राऊत यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत त्यांना सहकारामधील काय कळतं? एका सहकारी साखर कारखान्यासाठी किती शेयर होल्डर लागतात? त्याच्या प्रमुखाची कामे काय असतात? याचा राऊत यांनी आधी अभ्यास करावा, मग सहकारावर बोलावे. ज्या विषयातील माहिती नाही किंवा संबंध नाही अशा विषयात बोलू नये, असे पाटील म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार वाचविला असून साखरेला हमी भाव ठरवून दिला आहे. त्यामुळे साखर उत्पादक शेतकरी आनंदी आल्याचे ते म्हणाले.
=====
सहकार विभाग शहांकडे देण्याचा निर्णय वर्षभरापूर्वीचा
जरंडेश्वर साखर कारखान्यावरील कारवाईनंतर जे पत्र अमित शहा यांना पाठविले, त्यातील कारखान्यांची यादी ही अण्णा हजारे यांनी पाच वर्षांपूर्वीच दिलेली आहे. मी पत्र दिले म्हणून सहकार मंत्रालय अमित शहांकडे गेले नाही. याबाबतचे नियोजन वर्षभरापूर्वी झाले असावे. शहा यांच्यामुळे सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल, असे पाटील म्हणाले.
-----
नितीन गडकरी यांच्या साखर कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरकारभार झालेला नसल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली.