पुणे: सत्तेवर आल्यापासून मागील ९ वर्षात भारतीय जनता पक्षाने केवळ देश तोडण्याचे काम केले आहे. त्यांना जनहिताचे काहीही काम करायचे नाही. धर्माच्या आधारावर देशात फूट पाडायची आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या 'हात ते हात जोडे' या अभियानाला सोमवारी सुरूवात करण्यात आली.
महात्मा फुले समता भूमी स्मारकाजवळ झालेल्या या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मंत्री विश्वजीत कदम, आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे व अन्य प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले व पुण्यातून हे राज्याचे अभियान सुरू करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
देश अडचणीत असेल तर काँग्रेसच धाव...
राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात जो प्रतिसाद मिळाला त्यावरून देशातील सामान्य जनतेच किती खदखद आहे ते लक्षात आले. देश अडचणीत असेल तर काँग्रेसच धावते हा इतिहास आहे. त्याची पुनरावृती होणार आहे असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. सुशिलकुमार शिंदे यांनीही यावेळी काँग्रेसच्या देशकार्याचा धावता आढावा घेत, राहूल गांधी यांनी भारत जोडो मधून भारतीय जनतेत काँग्रेसविषयी विश्वास निर्माण केला आहे असे सांगितले. विश्वजीत कदम, संग्राम थोपटे, मोहन जोशी, शाम उमाळकर यांची यावेळी भाषणे झाली. अरविंद शिंदे, अविनाश बागवे यांनी सुत्रसंचालन केले. कमल व्यवहारे यांनी आभार व्यक्त केले. पटोले यांच्या हस्ते मोहिमेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.