...अशा नेत्यांवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी कडक कारवाई करावी" काँग्रेसचे प्रदेश प्रवक्त्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 03:16 PM2023-01-18T15:16:44+5:302023-01-18T17:34:44+5:30
काँगेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी जाहीरपणे माध्यमांवर बोलण्यामुळे पक्षाचे नुकसान
पुणे : राज्यातील काही असंतुष्ट नेते वैयक्तिक स्वार्थासाठी स्वपक्षावरच दुगाण्या झाडत असून या काम कमी बडबड जास्त नेत्यांवर राष्ट्रीय पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली. अशा नेत्यांमुळे काँग्रेसचे धिंडवडे निघत असल्याचा आरोप त्यांनी केला.
तिवारी यांचा रोख प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करणारे नागपूरचे माजी आमदार देशमुख यांच्याकडे होता. तिवारी म्हणाले, राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा १६ दिवस महाराष्ट्रात होती, त्यावेळी हे देशमुख तिथे कधीच दिसले नाही. आता मात्र ते सुधीर तांबे यांच्या उमेदवारीवरून पक्षाध्यक्षांवर टीका करत आहेत. देशमुखच नाही तर अनेक नेते पक्षहित विसरून पक्षाला अडचणीत आणत आहेत. त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
पक्षशिस्तीची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या अशा नेत्यांवर राष्ट्रीय पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्वरीत कारवाई करावी. अशी कारवाई झाली नाही तर कोणीही उठसूठ पक्षावर टीका करत बसेल. काही विरोधी मत असेल तर ते मांडण्यासाठी पक्षाचे व्यासपीठ आहे. पक्षातंर्गत व्यासपीठावर कोणीही आपले मत व्यक्त करू शकतो. मात्र जाहीरपणे माध्यमांवर बोलण्यामुळे पक्षाचे नुकसान होते. त्यामुळे यापुढे अशा नेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तिवारी यांनी केली.