बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वक्तव्य लोकशाही प्रक्रियेला काळिमा फासणारे आहे. ही लोकशाही प्रक्रियेची मानहानी असून ही प्रवृत्ती घातक आहे, अशा शब्दात भाजप नेते व माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नाना पटोले यांचा वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला.
पाटील पुढे म्हणाले, लोकशाही प्रक्रियेमध्ये पंतप्रधान हे पद सर्वोच्च आहे. पंतप्रधानपदाचा सन्मान ठेवणे ही प्रत्येक राजकिय पक्षाची जबाबदारीआहे. नाना पटोले यांनी या वक्तव्याबाबत जाहिर मागितली पाहिजे. जर पटोले यांनी माफी मागितली नाही तर भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. ज्या त्या पक्षांच्या प्रमुखांनी वरिष्ठ पातळीवर अशा पद्धतीची वक्तव्ये होऊ नयेत यासाठी खबरदारी घेतली पाहीजे, असेही यावेळी पाटील म्हणाले.
मी आमच्याकडील गावगुंडाबाबत बोललो - नाना पटोले यांचा खुलासा
जेवनाळा येथील सभेत काही नागरिक आमच्या परिसरातील मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार घेऊन आले होते. त्यांना तुम्ही घाबरु नका. मी तुमच्या सोबत आाहे. मोदीला मी मारु शकतो, शिव्या देऊ शकतो असे म्हटले. मी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'लोकमत'ला सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही संतापले
''पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो, असे म्हणतात. काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय?, असा सवाल भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.''
''कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला, सत्तेसाठी काहीही❓. काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. तसेच, नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केलीय.''