पुणे : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी ;आपल्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या राजीनाम्यामागे काँग्रेस अंतर्गत कुरघोडी व महाविकास आघाडीत धुसफूस असल्याची चर्चा देखील समोर येत आहे. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपली सावध प्रतिक्रिया दिली असली पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत आहे. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनाम्यावर रोखठोक भाष्य केले आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले,किमान समान कार्यक्रमानुसारच निर्णय घेतले जाणार आहे. याबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते ठरवणार आहे. तसेच नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या सत्रानंतर राजीनामा द्यायला हवा होता. मात्र, त्यांच्या पक्षश्रेष्ठींचा हा निर्णय आहे. त्यांच्या राजीनाम्यावरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. पटोले यांचा राजीनामा अनपेक्षित नाही, गेली काही दिवस यावर चर्चा सुरू होती.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले इच्छुक होते. दोन दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी काँग्रेस हायकमांडची दिल्लीत जाऊन भेट घेतली. त्यानंतर गुरूवारी त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. काँग्रेसकडून अध्यक्षपद घेऊन त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे, परंतु विधानसभा अध्यक्षपद आता रिक्त असल्याने ते खुले झाले आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विधानसभा अध्यक्षपदासाठी दावा केला आहे.
नाना पटोले यांच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज? काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींमुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे, एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नेत्यांची लॉबी सुरू झाली असताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी राजीनामा दिला. पटोलेंच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती आहे. त्यातच शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे आघाडीतला अविश्वास वाढवण्याची शक्यता आहे.